Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चऱ्होलीत बिबट्याची दहशत: काळजेवाडी, ताजणे मळ्यात पाळीव प्राणी लंपास; शेतीकामे ठप्प

​वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी; मजुरांनी फिरवली पाठ, नागरिक भयग्रस्त

​पिंपरी | प्रतिनिधी

चऱ्होली बुद्रुक परिसरातील काळजेवाडी, चोविसावाडी आणि ताजणे मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने ठिय्या मांडला आहे. बिबट्याचा वावर थेट मानवी वस्तीत वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून, अनेक पाळीव जनावरे गायब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

​उसाच्या शेताचा बिबट्याला ‘सुरक्षित’ आधार

​काळजेवाडी चोविसावाडी डी.पी. रस्त्यावरील ऋषिकेश काळजे यांच्या शेतात, तसेच एअरपोर्ट रस्त्यावरील तनिष ऑर्किड, राही कस्तुरी आणि ग्लोबल सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी बिबट्याला झाडावर आणि भिंतीवर बसलेले पाहिल्याने या दहशतीत भर पडली आहे.

​शेती अर्थचक्राला ब्रेक

​बिबट्याच्या भीतीमुळे परप्रांतीय आणि स्थानिक मजूर शेतात कामाला येण्यास तयार नाहीत. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे जीवघेणे ठरत असल्याने पाणी देणे बंद झाले आहे. यामुळे पिके सुकू लागली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा      :        ‘मविआ’च्या मतांच्या विभाजनाचा महापालिकेतही फटका बसेल? अंबादास दानवे म्हणाले..

“बिबट्या थेट वस्तीजवळ येत असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मजूर कामावर येत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. सायंकाळनंतर परिसरात फिरणे धोक्याचे झाले आहे.”

— सचिन कोतवाल, स्थानिक रहिवासी

“बिबट्याचा वावर सातत्याने वाढत आहे. रात्रीच्या वेळी तर सोडाच, पण दिवसाही शेतात पाऊल टाकताना भीती वाटते. मजुरांनी कामावर येण्यास नकार दिल्याने आमची उभी पिके धोक्यात आली आहेत. वनविभागाने केवळ पाहणी न करता तातडीने पिंजरा लावून हा प्रश्न मार्गी लावावा.”

— अनुराधा साळुंके, स्थानिक रहिवाशी

​नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

  • पिंजरा लावणे: ज्या भागात बिबट्या वारंवार दिसतो, तिथे त्वरित पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे.
  • ​रात्रीची गस्त: वनविभागाने परिसरात नियमित रात्रीची गस्त वाढवावी.
  • ​प्रकाश व्यवस्था: निर्मनुष्य रस्ते आणि अंधाऱ्या पट्ट्यात सौर पथदिवे बसवावेत.
  • ​वनपरिक्षेत्र अधिकारी अमित राठोड यांनी परिसराची पाहणी करण्याचे आश्वासन दिले असून, नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button