Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महानगरपालिका निवडणुकांवर भरारी पथकांची नजर

मुंबई : महानगरपालिका निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याकरिता आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी. त्याचबरोबर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुसज्ज ठेवावित आणि मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी दिले.

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधण्याचे आदेश देतानाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी/ कर्मचारी, आवश्यक साहित्य इत्यादींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मतदारांना सहज व सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी असे त्यांनी सांगितले.

आयोगाचे सचिव काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले. महानगरपालिकेसंदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी तपशीलवार माहिती दिली. उमेदवारांच्या यादीतील आणि मतपत्रिकांवरील उमेदवारांच्या नावांचा क्रम राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूक नियमात केलेल्या सुधारणेनुसार लावावा. निवडणूक चिन्ह वाटपासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता महानगरपालिका आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button