थंडीच्या लाटेत माणुसकीची उबदार माया!
माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म - अनुराधा साळुंके

अनुराधा दीपक साळुंके यांचा भिक्षेकऱ्यांसाठी ब्लॅंकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्रात सध्या तीव्र थंडीची लाट पसरली असून अनेक भागात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या अनेक भिक्षेकऱ्यांना या थंडीचा मोठा फटका बसत आहे. उघड्यावर राहणाऱ्या या गरजू आणि निराधार लोकांची थंडीमुळे होणारी अवस्था पाहून चऱ्होली येथील सामाजिक कार्यकर्ते अनुराधा दीपक साळुंके यांनी माणुसकीचा परिचय देत ब्लॅंकेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
इंद्रायणी नदी परिसरात अनेक भिक्षेकरी आणि निराधार व्यक्ती वास्तव्यास असून थंडीच्या दिवसांत त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नाही. थंडीमध्ये कुडकुडणाऱ्या या भिक्षेकऱ्यांची अवस्था पाहून अनुराधा साळुंखे यांना तीव्र संवेदना वाटली. आपण माणूस आहोत आणि माणुसकीचा धर्म जपला पाहिजे या भावनेतून त्यांनी या उपक्रमाचा निर्णय घेतला.
हेही वाचा – मेक्सिकोच्या ‘टॅरिफ बॉम्ब’ला भारताचे प्रत्युत्तर! ५० टक्के टॅरिफ वाढीनंतर दिला ‘हा’ इशारा
या संदर्भात त्यांनी आपल्या पती दीपक साळुंके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही या उपक्रमास त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शवली. सोबत काही सहकारी मित्रांना घेतले. त्यानंतर स्वतः पुढाकार घेत त्यांनी इंद्रायणी नदी परिसरातील भिक्षेकऱ्यांना ब्लॅंकेटचे वाटप केले.
माणुसकीची भावना सर्वव्यापी!
हा परिसर अनुराधा साळुंके यांच्या मतदारसंघात नसतानाही माणुसकी ही सर्वव्यापी असते या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबवला. परिसरात फेरफटका मारताना भिक्षेकऱ्यांची थंडीमुळे होत असलेली कुचंबणा पाहून त्यांना स्वस्थ बसवेना. अनुराधा दीपक साळुंके यांच्या या विधायक आणि संवेदनशील उपक्रमाची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा होत असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. थंडीच्या काळात गरजूंसाठी दिलासा देणारा हा उपक्रम समाजातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामधून “जो जे वांछील तो ते लाहो” असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे माणुसकीची भावना ठेवत संत ज्ञानोबांच्या आदर्शांवर चालण्याचा छोटासा प्रयत्न आहे. “देणाऱ्याने देत जावे” असे म्हटले जाते. त्याप्रमाणे आपण एखाद्या गरजूंसाठी काही करू शकतो ही भावना महत्त्वाची आहे.
-अनुराधा दीपक साळुंके,सामाजिक कार्यकर्त्या





