‘मीरा-भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटीत लाटली’; विजय वडेट्टीवारांचा प्रताप सरनाईकांवर आरोप

मुंबई | राज्यात सत्ताधारी पक्षांतील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर जमीन लाटल्याचे आरोप वाढत असून यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील महार वतनाची तब्बल १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठा आरोप समोर आला आहे.
काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर परिसरातील सुमारे २०० कोटी किमतीची जमीन फक्त ३ कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मोक्याच्या ठिकाणी ४ एकर जमीन, ज्याचे बाजारमूल्य ४०० कोटी रुपये आहे, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो.
राज्यामध्ये घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुण्यात जमिनीशी संबंधित प्रचंड मोठे घोटाळे होत आहेत. यामध्ये १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घोटाळ्यांचा समावेश आहे. बिल्डर, डेव्हलपर आणि राजकारण्यांनी जमिनी बळकवण्याचा सपाटा लावला आहे. आज हा करार रद्द झाला, या करारामध्ये समावेश असणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. परंतु, मूळ प्रश्न असा आहे की, कंपनीचा जो मालक आहे, तो सुद्धा यामध्ये दोषी आहे. त्याच्यावरही कारवाई व्हावी. ज्या पद्धतीने दिग्विजय पाटील आणि सब-रजिस्ट्रारवर कारवाई झाली, उद्या उद्योग संचालनालयावर होईल. या व्यवहारात महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सूट दिली, ते सुद्धा दोषी आहेत, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.





