साथीचे आजार रोखण्यासाठी पाच लाख घरांची तपासणी
महापालिकेकडून जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर

पिंपरी चिंचवड : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने तब्बल पाच लाख घरांची तपासणी केली असून, महापालिकेकडून जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक व्यापकपणे राबवण्यात येत आहेत. औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे.
हेही वाचा – संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेच्या नेत्यांवर भ्याड हल्ल्यां विरोधात निषेध आंदोलन
पालिकेची कारवाई
महापालिकेने ५ लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, १ हजार २३८ भंगार दुकाने, १ हजार ६०९ बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या ३ हजार ४३१ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून ६२४ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करीत २२ लाख २४ हजार इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून डेंग्यू, मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या परिसरातील स्वच्छता राखून या व्यापक मोहिमेस सहकार्य करावे
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक,,पिंपरी चिंचवड महापालिका
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांचा प्रभागनिहाय आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी देखील आपले घर व परिसरात स्वच्छता राखावी. तसेच आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




