MSCB घोटाळ्यात ED चं आरोपपत्र; रोहित पवारांची मात्र ठाम भूमिका, ‘फितुरीला थारा नाही…’

Rohit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, कुणाचं ऐकलं नाही म्हणूनच माझ्याविरोधात ईडीने कारवाई) केली, हे सगळ्यांनाच माहित आहे. यावर अधिक बोलण्याची गरज वाटत नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे पालन करणारे आहेत. त्यांनी त्यांना जे आदेश मिळाले, त्याचेच पालन केलं. आता आरोपपत्र दाखल झालंय.
हेही वाचा – राऊत-विरुद्ध शिरसाट वाद आता कोर्टात; शिरसाटांनी राऊतांविरोधात ठोकला अब्रू नुकसानीचा दावा
याआधी जानेवारी 2023 मध्ये ईडीने रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. या तपासाअंतर्गत, एजन्सीने बारामती अॅग्रोची 50 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे या प्रकरणात रोहित पवार यांची अडचण आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED ने कारवाई केली, हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच…! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!




