ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

भंपकपणाचा कळस म्हणजे काय रे भाऊ?

राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड बिछूट आणि बेमुर्वतखोरपणाबद्दल कुख्यात आहेत. समाजात किंवा राजकारणात घडलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल व्यक्त होणे हा जन्मसिद्ध हक्क आहे, असे आव्हाडांना वाटते आणि मग ते बिनधास्त आणि बेछूट वक्तव्ये करतात. त्यातून मग कधी कधी त्यांनी काढलेले उद्गार हे भंपकपणाचा कळस म्हणून गणले जातात. कसलाही अभ्यास नाही, कोणतीही दूरदृष्टी नाही.. फक्त शरद पवार यांच्या पक्षात राहून किंवा सतत त्यांची स्तुती करून आपली पक्षातील जागा टिकवणे हे मात्र या भंपक माणसाला पुरेपूर जमले आहे, हे महत्त्वाचे !

सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड

महाविकास आघाडीच्या हातून अडीच वर्षांची आलेली सत्ता गेल्यानंतर सत्तारूढ पक्षाला म्हणजेच ‘महायुती’ तल्या तीन पक्षांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत ‘टार्गेट’ करणे सुरू आहे. असे लक्ष्य करण्यात चुकीचे काही नाही विरोधी पक्ष म्हटल्यानंतर सत्तारूढ पक्षातील चुका त्रुटी दाखवणे, हे विरोधकांचे कामच आहे. मात्र, लोकशाही परिपक्व असेल तर आणि विरोधकांना विवेकीमूल्यांचे भान असेल, तर शेरे मारणे, टीका करणे चुका दाखवणे विधायक किंवा रचनात्मक पातळीवर होत असते.

सैफ अलीच्या हल्ल्याला जातीय रंग

दरम्यानच्या काळात आत्ता २०२४ सालात विधानसभेत विरोधी पक्ष नेता ही न नेमता येण्यासारखी झालेली महाविकास आघाडीतल्या पक्षांची परिस्थिती, केवळ विरोधा करता विरोध किंवा समाजविघातक मतभेद दाखवण्यापलीकडे काही करताना दिसत नाही. यातील अगदी ताजे उदाहरण म्हणजे सैफ अली खान या अभिनेत्याच्या घरात झालेला चोरीचा प्रयत्न..सैफ बरोबर चोरट्याची झालेली झटापट.. त्यामध्ये सैफ अली खान याचे जखमी होणे. या सगळ्याला आमदार आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जो जातीय रंग देण्याचा अट्टाहास केला, तो मात्र निषेधार्थ आहे.

आव्हाडांच्या बुद्धिमत्तेची कीव

सकाळी हल्ल्याच्या बातम्या प्रसारित व्हायला लागल्याबरोबर, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा कस पणाला लावून त्याला जातीय रंग देण्यास सुरुवात केली. करीना आणि सैफ यांच्या मुलाचे नाव तैमूर आहे आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले म्हणून कट्टर हिंदुत्ववादी संघटना सैफ अली खानला ठार मारण्यासाठी त्याच्या घरात घुसल्या, असा जावईशोध या घटनेनंतर दोन, चार तासातच जितेंद्र आव्हाड यांनी लावला. तो चोर पकडून त्याच्या तोंडून तो चोरी करता गेला होता, हा जबाब येईपर्यंत जितेंद्र आव्हाड आपल्या मतावर ठाम होते.

जितेंद्र आव्हाड ही समाज विघातक प्रवृत्ती आहे. प्रत्येक घटनेला जातीय रंग देत असताना लोकशाहीने संविधानाने कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली आहे आणि त्यानुसार आपल्याला वर्तन करावे लागेल, हे मान्य न करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी जातीय आणि संविधानाचे तसेच सरकारवर कायदा सुव्यवस्था ढिसाळ असल्याचे आरोप करणे हास्यास्पद आहे.

हेही वाचा  :  महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी 

करमुसे यांची मारहाण अगदी ताजी

जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यावर करमुसे नामक व्यक्तीला आपल्या सुरक्षारक्षकांकडून उचलून आपल्या घरी आणून, त्याची पाठ फुटेपर्यंत मारहाण केली. त्यांना याचा विसर वारंवार होत असतो. मंत्रीपदावर असताना आव्हाड यांनी केलेले हे मग्रुरीचे वर्तन ते स्वतः कसे काय विसरतात, याचे आश्चर्य वाटते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे ? याचे मोजमाप करण्यास जितेंद्र आव्हाड यांना सांगितलेले नाही. ते त्या क्षमतेचे आणि लायक उमेदवारही नाहीत.

घडणाऱ्या घटनेला कायद्याच्या चौकटीतून न पाहता जातीयतेच्या मोठ्या वर्तुळातून ते नेहमी पाहत आले आहेत. विशेषतः विरोधी पक्षातील बहुतेक सर्व प्रवक्ते मंडळी कोणत्याही गुन्ह्याची घटना घडली की गुन्हेगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे का? भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहे का? किंवा तो तसा या संघटनांशी जवळचा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न कसोशीने केला जातो. कोणी एकेकाळी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे आव्हाडांचाच बाप असणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षात आनंदाने मिरवत होते. याचा विसरही आव्हाड यांना पडतो.

उचलली जीभ लागली टाळ्याला!

भारतीय जनता पक्षाने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहभागी करून तात्विकता हा अयोग्य वर्तनच केले आहे. अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणे भारतीय जनता पक्षाची चूकच होती आणि त्याची कडू फळे वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या कर्तृत्वाने भाजप चाखतच आहे. लहान मुलीवरील अत्याचाराची घटना, एखाद्याच्या हत्येची घटना या दुर्दैवी, संतापजनक, निषेधार्थ आणि जात-पात पक्ष यापलीकडे जाऊन शिक्षेस पात्र असणाऱ्याच घटना आहेत.

महत्वाचे म्हणजे गुन्हेगार आमच्या पक्षाचा आहे की दुसऱ्या पक्षाचा आणि त्यावरून आनंदाचे भरते आल्यासारखे तपासापूर्वीच निष्कर्ष काढणे सर्वच राजकीय पक्षांनी आता थांबवावे. उचललेली जीभ आणि लावली टाळ्याला आणि ही जीभ टाळ्याला लावत असताना त्यातून समाज कसा दुभंगेल याचा विचार हा घातक आहे, आणि अशा विचारांना आपण समाजातच मोठ्या प्रमाणात पसरवतो आहे, याची नोंद सर्वच पक्षातील प्रवक्ते मंडळींनी घेतली पाहिजे.

जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या मुंब्रा परिसरात राहत असून त्यांचे बहुसंख्य मतदार हे मुस्लिम आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आपल्या मतदारांचे तुष्टीकरण करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांची ही उठाठेव आहे, हे प्रत्येक जण जाणतो. परंतु, आव्हाडांचे हे नसते उद्योग थांबत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button