राज्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता, महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Weather | राज्यातील हवामानसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता ३ व ४ डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘टिपू सुलतान हे इतिहासातील जटिल व्यक्तिमत्व’; एस. जयशंकर यांचे विधान
या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
मंगळवार ३ डिसेंबरला तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





