‘मशिदीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत आणि..’; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

Ramdas Athawale | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका सभेत केलं. यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. मशिदीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत, अशी भूमिका आठवलेंनी मांडली.
रामदास आठवले म्हणाले, की राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशिदीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेली तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वत:च्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?
हेही वाचा – अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त
मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हटविण्यापेक्षा विषमता, जातीयता हटविली पाहीजे. केवळ १४० – १४५ उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणाऱ्यांना धडा शिकवल्या राहणार नाही, असंही रामदास आठवले म्हणाले.





