वाकडमध्ये आमदार निधीतून झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न: शंकर जगताप
मिशन विधानसभा: महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे रखडलेल्या वाकडच्या विकासाला स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच गती!
![Opposition trying to take credit for development work done with MLA funds in Wakad: Shankar Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Shankar-jagtap-1-780x470.jpg)
चिंचवड : चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढविणाऱ्या वाकडमधील स्थानिक उमेदवाराने वाकड गावच्या विकासासाठी काहीही केले नाही. याउलट त्यांच्यामुळे अनेक वर्ष गावातील विकासकामांना खीळ बसला होता. मात्र स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकासाकामांमुळे या वाकड गावचा कायापालट झाला. त्यामुळे गावचा विकास अखंडितपणे सुरू राहावा यासाठी यावेळीही आम्ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी असल्याची भावना; वाकडमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय (आठवले) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज वाकड परिसरातील विविध वस्त्या आणि सोसायट्यांना भेट देऊन स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांच्या भेटी गाठी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या गावभेट दौऱ्यात शंकर जगताप यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. नागरिकांकडून दीपावलीच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत जगताप यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वाकडकरांनी जगताप यांचे जंगी स्वागत केले. “आज जो वाकडचा हा विकास दिसून येत आहे त्याचे सर्व श्रेय हे स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आहे. त्यामुळे यापुढेही वाकडच्या विकासासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ शंकर जगताप यांच्यासोबत आहोत, असा विश्वास यावेळी नागरिकांनी जगताप यांना दिला.
दरम्यान, शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून प्रचाराची मोठी आघाडी घेतली असून त्यांना समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महिला वर्गही या पदयात्रेत हिरीरीने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
वाकडमधील विरोधकांचं म्हणणं आहे की वाकडमध्ये कोणतेही विकासकामे झालेली नाहीत. मात्र दुसरीकडे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या आमदरनिधीतून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करायचा. आमदार निधीमधून वाकडमध्ये सांस्कृतिक भवनची उभारणी, योगा हॉल, ठिकठिकाणी ओपन जिम, वाहतूक बेटाची निर्मिती, महिला व पुरुषांसाठी ई-टॉयलेटची सुविधा, समाज मंदिर, विविध सोसायट्यांमध्ये विद्युत सोलर सिस्टीम, ग्रीड सोलार पावर प्लांट व रुफ टॉप बसविणे, शासकीय जागेत इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, ड्रेनेज लाईन तसेच जलनिस्सारण लाईन टाकणे असे सुमारे तीन ते साडे तीन कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. तरीदेखील विरोधकांकडून प्रभागात काम न झाल्याचे आरोप केले जातात. त्यामुळे विरोधकांचे आपल्या प्रभागात किती लक्ष आहे हे स्पष्ट होते. आपली निष्क्रियता लपविण्यासाठीच विरोधकांकडून हे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहे. मात्र वाकडची जनता सुज्ञ असून ती या खोट्या भूलथापांना बळी न पडता विकासकामांना मत देतील.
– शंकर जगताप, उमेदवार, भाजपा महायुती.