‘मला माफ करा, मी माझे शब्द..’; कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून कंगनाने मागितली माफी

Kangana Ranaut | केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी भाजप खासदार कंगना रणौत यांनी केली होती. कंगना रणौत यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. यानंतर कंगना रणौत यांनी एक व्हिडीओ शेअर करत कृषी कायदा परत लागू करण्यातबाबत केलेल्या विधानबाबत माफी मागितली आहे.
कंगना रणौत म्हणाली, काही दिवसांपासून माध्यमांनी मला कृषी कायद्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावर बोलताना मी असं सुचवलं होतं की, शेतकऱ्यांची कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करायला हवं. मात्र, माझ्या या विधानावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याला अनेक लोकांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर अतिशय सहानुभूतीपूर्वक पंतप्रधान मोदी यांनी ते कृषी कायदे मागे घेतले होते. त्यामुळे माझ्यासह सर्वच कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे.
हेही वाचा – बिग बॉस मराठीचा विजेता ठरला? ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल..
https://x.com/KanganaTeam
मला देखील हे लक्षात घ्यायला हवं की, मी आता एक कलाकार नाही, तर भाजपाची एक कार्यकर्ती देखील आहे. त्यामुळे माझे मत हे माझं नसलं पाहिजे, ती माझ्या पक्षाची भूमिका असली पाहिजे. मात्र, तरी माझ्या विधानामुळे कोणी दुखावलं असेल तर मला माफ करा. मी माझे शब्द परत घेते, असं कंगना यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कंगना रणौत यांच्या विधानावर बोलताना भाजप नेते गौरव भाटिया म्हणाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपा खासदार कंगना राणौत यांचे केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायद्यासंदर्भातील विधान व्हायरल होत आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की, हे विधान त्यांचं वैयक्तिक विधान आहे. कंगना रणौत यांना भाजपाच्यावतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही. तसेच कृषी कायद्यासंदर्भातील विधान म्हणजे भाजपाची ती भूमिका नाही.





