बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढणार का? जय पवारांचं सूचक विधान; म्हणाले..

बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो, असं मोठं विधान केलं होतं. त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जय पवार निवडणूक लढणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत जय पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू आहे. आज ही जनसन्मान यात्रा बारामतीत आहे. यावेळी जय पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज या कार्यक्रमासाठी पक्षाचे सर्वच नेते उपस्थित आहेत. सर्व तरुणांचा पुढाकार आहे. मात्र, अजित पवार काय निर्णय घेतील ते बघूयात. माझी इच्छा ही अधिपासूनच सर्वांना मदत करण्याची आहे. अजित पवारांनी मतदारसंघात ज्या प्रकारे काम केलं आहे. त्या प्रकारे लोकांचे कामं करायची आहेत.
हेही वाचा – ..तर मी राष्ट्रवादीत परत जाईन; एकनाथ खडसेंचं भाजप प्रवेशावर मोठं विधान
बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसं.
जय पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले आहेत?
शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू, असं अजित पवार म्हणाले.





