..तर मी राष्ट्रवादीत परत जाईन; एकनाथ खडसेंचं भाजप प्रवेशावर मोठं विधान

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अद्याप त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजपाच्या प्रवेशाबाबत मौन सोडत मोठं विधान केलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा याबाबत मी भारतीय जनता पक्षाला विनंती केली होती. मात्र, भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचा सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सदस्यपदाचा राजीनामा मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला. मात्र, त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) आमदार आहे. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास विरोध केलेला आहे.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मग अशा परिस्थितीमध्ये मी आणखी काही दिवस भारतीय जनता पक्षाची वाट पाहील. अन्यथा मी माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुन्हा जॉईन करेन आणि कामाला सुरुवात करेन. भाजपात प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. त्यासाठी काही कारणंही होते. त्या संदर्भात मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे चर्चाही केली होती. माझ्याकडे अडचणी होत्या, त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असं असं वाटलं होतं. मात्र, आता मला विचार करावा लागेल, असंही एकनाथ खडसे म्हणाले.





