महायुतीत असताना उमेदवार कसा जाहीर करता? हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना सवाल

पुणे | विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अशातच भाजपला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. महायुतीमध्ये एक पक्ष उमेदवारी जाहीर कसा करतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, जनतेचा आग्रह हा महत्वाचा असतो. कारण कुठलाही पक्ष हा जनतेवर अवलंबून असतो. शेवटी जनता महत्वाची असते आणि जनतेचं मत काय आहे? हे देखील महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने आमचा प्रवास सुरु आहे. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमधील नेत्यांनी काही गोष्टी मला कबूल केल्या होत्या. त्यामुळे एकदा त्यांना भेटून वस्तुस्थिती काय आहे? ते पाहणार आहे.
हेही वाचा – ‘औकातीत राहून बोलायचं’; मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची औकात काढली
आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपआपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. एकदा आमचा दौरा होऊ द्या. त्यानंतर मग सर्व प्रमुख लोकांशी संवाद साधून विचारविनिमय करावा लागेल. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. शेवटी सध्याचा काळ असा आहे की, जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्या पद्धतीने पुढे चर्चा करू, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महायुती म्हटल्यानंतर तीन पक्ष आले. आता महायुतीमधील तीन पक्षांपैकी एक पक्ष तर काही मतदारसंघात जाऊन उमेदवारच जाहीर करायला लागला आहे. आमच्या मतदारसंघातही त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं की आम्हीच पुन्हा लढवणार वैगेरे-वैगेरे.., असं बरंच काही त्यांनी सांगितलं. मग महायुतीमधील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय झाले आहेत की नाही? नेमकं काय ठरलं आहे? याबाबत आम्हालाही काही समजायला मार्ग नाही. त्यामुळे या विषयांवर आम्ही वरिष्ठ नेत्यांशी एकदा बोलणार आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी अप्रत्यक्ष अजित पवारांवर निशाणा साधला आहे.





