‘औकातीत राहून बोलायचं’; मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्याची औकात काढली

Tanaji Sawant | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी आता आणखी एक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत, असं म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला.
शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर मंत्री तानाजी सावंत म्हणाले, सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. आम्हालाही कळतं कोणाची तरी सुपारी घ्यायची, इथे उभं राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाच्या खडा टाकायचा. आम्हीही उडत्याची मोजतो. प्रत्येकाने आपापल्या औकातीत राहून बोलायचं. औकातीत राहून विकास करून घ्यायचा.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत ‘अफवा’
आपल्या भूम परांडा वाशी साठी अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे आपल्या हक्काचे पाणी..आपल्या सततच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत, उजनीचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी बोगद्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही तातडीने पूर्ण करून साधारपणे गुढीपाडव्यापर्यंत हे पाणी सीना कोळेगाव धरणात येईल, असंही तानाजी सावंत म्हणाले.





