टीप मिळाली म्हणून ६ जणांनी दरोडा टाकला; ५० लाखांच्या जागी मिळाले…
![After receiving the tip, 6 persons committed robbery; Found in place of 50 lakhs ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/After-receiving-the-tip-6-persons-committed-robbery-Found-in-place-of-50-lakhs-....png)
जळगाव : जळगाव शहरातील आर्किड हॉस्पिटल शेजारी रिध्दी अशोक जैन यांच्या घरात ५० लाखांची रोकड असल्याची टीप तरुणांना मिळाली. त्यानुसार सहा जणांनी नियोजनबध्द पध्दतीने भरवस्तीत असलेल्या या घरी दरोडा टाकला. यादरम्यान महिलेला मारहाणही केली. मात्र, हाती काही न लागल्याने दरोडेखोरांना रिकामे हात परतण्याची वेळ आली होती.
दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयितांपैकी दोन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मुसक्या आवळल्या आहेत. इतर संशयित पसार आहेत. सागर जयंत पाटील वय-२५ मुळ रा.कुसुंबा बु ता. रावेर ह.मु. श्री. अपार्टमेंट राम समर्थ कॉलनी, जळगाव व प्रशांत शिवाजी पाटील वय २७ रा. मातोश्री नगर, धरणगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात रिद्धी अशोक जैन (वय २७) या दि. १२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान, टीव्ही पाहत असताना एक अनोळखी भामटा व त्याचे ५ साथीदाराने घरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला. यादरम्यान दरोडेखोरांनी रिध्दी जैन तसेच त्यांच्या आईला खाली ओढून जमिनीवर पाडले व गळा दाबला होता. याप्रकरणी जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३ रोजी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलीस अधीक्षकांनी एलसीबीच्या निरीक्षकांना गुन्ह्याच्या शोधासंदर्भात सूचना दिल्या होत्या. बकाले यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके नेमली होती. गुन्ह्याच्या शोधासाठी पथकांमध्येच स्पर्धा लागून होती. पथक दिवसरात्र गोपनीय माहिती काढणे, तांत्रिक बाबी तपासणे, सीसीटीव्ही फुटेज काढणे अशा पद्धतीने तपास करीत ६ संशयितांची नावे निष्पन्न केली होती.
पथकाने सागर जयंत पाटील वय-२५ मुळ रा.कुसुंबा बु ता. रावेर ह.मु. श्री. अपार्टमेंट राम समर्थ कॉलनी, जळगाव यांस प्रथम ताब्यात घेवून त्याला विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत इतर साथीदारांची नावे सांगितली. पथकाने प्रशांत शिवाजी पाटील वय २७ रा. मातोश्री नगर, धरणगाव, कमलेश प्रकाश सोनार रा. गाडगेबाबा नगर, पाचोरा, प्रमोद कैलास चौधरी रा. कळमसरा ता.पाचोरा, गोविंद शंकर पाटील रा.कळमसरा ता.पाचोरा, गणेश बाबुराव पाटील (धनगर) रा. शेंदुणी ता.जामनेर असे असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रशांत शिवाजी पाटील हा सुध्दा घरी मिळून आल्याने त्यास सुध्दा ताब्यात घेतले.
इतर आरोपी अगोदरच त्यांचे घरून पसार झाल्याने ते घरी मिळून आले नाही. अटकेतील संशयित सागर पाटील हा बेरोजगार असून त्याचेवर यापूर्वी जिल्हापेठ एक गुन्हा दाखल आहे. तसेच कमलेश प्रकाश सोनार याचेवर १) पाचोरा पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच प्रमोद चौधरी याचेवर पहूर जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.