पिंपरी / चिंचवडपुणे

सांगवीतील ‘त्या’ खून प्रकरणाला वर्चस्ववादासह राजकीय किनार

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा दुस-या सराईत गुन्हेगाराने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून गोळ्या घालून खून केला. दत्त जन्मोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी (दि. 18) सकाळी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगेश रवींद्र जाधव (वय 36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा भाऊ जितेश रवींद्र जगताप (वय 25, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकी घेऊन आरोपी पसार

आरोपी गणेश हनुमंत मोटे आणि अश्विन अनंतराव चव्हाण या दोघांनी गोळीबार केल्यानंतर रस्त्याने दुचाकीवरून जाणा-या गौरव किशोर कर्णावट (वय 37, रा. दापोडी) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलाचा धाक दाखवला आणि गौरव यांची मोपेड दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी गौरव कर्नावट यांच्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश आणि अश्विन यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत जगताप राजकारणातही सक्रिय

मृत योगेश जगताप हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे यांसारखे सात गुन्हे दाखल होते. त्याने अलीकडच्या काळात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. तो राजकारणात देखील सक्रिय झाला होता. त्याच्या पत्नीने महापालिका निवडणूक लढवली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याने रविवारी काटेपुरम चौकात दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर गोळीबार झाला.

आरोपी मोटे सराईत गुन्हेगार

आरोपी गणेश मोटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सन 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, दुखापत, मारामारी, दंगा करणे असे सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून सात लाखांचे दागिने जप्त केले होते. त्याने मौजमजा करण्यासाठी तसेच पबमध्ये पैसे उधळण्यासाठी चेन चोरीचे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले होते.

मयत योगेश जगताप याच्या कार्यकर्त्यांनी आरोपी गणेश मोटे याच्यावर दोन वर्षांपूर्वी वर केले होते. तेंव्हापासून मोटे याच्या मनात जगताप याच्याविषयी सल होती. जगताप हा मोटेला चारचौघात भाव देत नव्हता, त्याचा देखील मोटेच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने कट रचून जगताप याचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे.

पोलिसांच्या एक्स ट्रॅकरला चकवून तडीपार गणेश मोटे शहरात

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या आरोपींवर नजर ठेवण्यासाठी एक्स ट्रॅकर हे अॅप्लिकेशन सुरु केले आहे. सराईत गुन्हेगारांचे दररोज लोकेशन आणि सेल्फी या एक्स ट्रॅकर अॅप्लिकेशनद्वारे पोलीस घेतात. काही गुन्हेगार पोलिसांना कॅमेरा बंद आहे, नेट पॅक संपलाय, मोबाईल बंद आहे, घरात लाईट नाही अशी फालतू करणे देऊन अपडेट देणे टाळतात.

आरोपी गणेश मोटे याला सन 2019 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यानंतर तो सोलापूर येथे त्याच्या बहिणीकडे राहत होता. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवरून पोलिसांना लोकेशन आणि सेल्फी पाठवत असे. मात्र मागील काही दिवसांपूर्वी त्याने बहिणीच्या मोबाईल मधून एक्स ट्रॅकर हे अॅप्लिकेशन डिलीट केले. त्याने यापूर्वी पोलिसांना फालतू कारणे देऊन लोकेशन व सेल्फी देणे टाळले होते. अॅप्लिकेशन डिलीट केल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित पोलिसांनी त्याला योग्य वेळी ट्रॅक केले असते तर भर दिवसा गोळीबार करून खून करण्याचा प्रकार घडला नास्ता, असे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button