breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा दिल्लीवर दणदणीत विजय

मुंबई – आयपीएल 2021 स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. यावेळी दिल्लीने विजयासाठी राजस्थानला 148 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीकडून कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी दिल्लीने दिलेले आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केले. ख्रिस मॉरीसने अखेरच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. राजस्थानकडून विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्रिस मॉरीसने 18 चेंडूत 36 धावा फटकावत सामन्यात राजस्थानला विजय मिळवून दिला.

सामन्याच्या सुरुवातीला दुसऱ्याच षटकात राजस्थान रॉयल्सचा जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकटने धोकादायक पृथ्वी शॉला माघारी धाडले. अवघ्या ५ धावांवर पृथ्वी शॉ बाद झाला आणि दिल्लीला पहिला झटका बसला. त्यापाठोपाठ चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर जयदेव उनाडकटने दिल्लीचा दुसरा सलामीवीर शिखर धवनला बाद केले. यष्टीरक्षक आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शिखर धवनचा अफलातून झेल टिपला आणि दिल्लीला चौथ्या षटकात दुसरा झटका बसला. धवननंतर मैदानात उतरलेल्या संयमी अजिंक्य रहाणेकडून दिल्लीच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र पुन्हा उनाडकट समोर आला आणि अजिंक्य रहाणेने त्याच्याच गोलंदाजीवर त्यालाच सोपा झेल दिला. त्यामुळे ६ षटकांनंतर दिल्लीची अवस्था ३६ धावांवर ३ विकेट अशी झाली. उनाडकटपाठोपाठ मुस्तफिझूरनेदेखील आपली करामत दाखवत धोकादायक मार्कस स्टॉयनिसला अप्रतिम बॉलवर मॉरिसकरवी झेलबाद केले. यानंतर आलेल्या ललित यादवच्या साथीने कर्णधार रिषभ पंतने डाव सावरायला सुरुवात केली. एकेरी-दुहेरी धावा करत त्याने धावफलक हलता ठेवला. अवघ्या ३० चेंडूंमध्ये रिषभ पंतने ५० धावा फटकावत दिल्लीचा स्कोअर १२ षटकांनंतर ८५ धावांपर्यंत पोहोचवला. मात्र दिल्लीसाठी हा दिलासा फार काळ टिकला नाही. रियान परागने आपल्याच गोलंदाजीवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिषभ पंतला धावचीत करून माघारी धाडले. मग ललित यादव २० धावांवर असताना मॉरिसच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना बाद झाला. राहुल तेवतियाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. शेवटच्या फलंदाजांनी केलेल्या छोट्या भागीदाऱ्यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य ठेवले.

१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सावध सुरुवात केली. पहिल्या २ षटकांत अवघ्या ५ धावा राजस्थानने केल्या. मात्र पुढच्या २ षटकांत राजस्थानच्या ३ विकेट्स पडल्या. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ख्रिस वोक्सने दिल्लीला पहिली विकेट मिळवून दिली. ९ धावांवर मनन वोराला वोक्सने रबाडाकरवी झेलबाद केले. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोकादायक जोस बटलरला रिषभ पंतकरवी झेलबाद केले. त्यामुळे राजस्थानला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून राजस्थानचा संघ सावरलाच नाही, तोपर्यंत वोहराचा अप्रतिम झेल घेणाऱ्या रबाडाने गोलंदाजी करताना कर्णधार आणि पहिल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसनचा मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे राजस्थानची चौथ्याच षटकात १७ धावांवर ३ विकेट अशी अवस्था झाली. मग डेविड मिलरने शिवम दुबेला साथीला घेत राजस्थानच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली पण आठव्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनने शिवम दुबेचा झेल टिपला. २ धावांवर शिवम दुबे माघारी परतला. त्यापाठोपाठ रियान परागनेदेखील राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांची निराशाच केली. तो २ धावांवर झेलबाद झाला. यानंतर आलेल्या राहुल तेवतियाला साथीला घेत डेविड मिलरने राजस्थानचा डाव सावरला. या जोडीने १५व्या षटकापर्यंत राजस्थानला ९० धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र रबाडाच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात राहुल तेवतिया १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेविड मिलरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे तो राजस्थानला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो, अशी आशा राजस्थानच्या चाहत्यांना वाटू लागली. सोळाव्या षटकात डेविड मिलरने लागोपाठ दोन उत्तुंग षटकार खेचले. मात्र त्यापुढचाच चेंडूवर चुकीचा फटका खेळून त्याने ललित यादवला सोपा झेल दिला. यानंतर ख्रिस मॉरिसने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. शेवटच्या षटकात ख्रिस मॉरिसने जोरदार फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ख्रिस मॉरिसने टॉम करनला उत्तुंग षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर पुन्हा षटकार खेचून मॉरिसने सामना राजस्थानच्या खिशात घातला. अवघ्या १८ चेंडूंमध्ये ख्रिस मॉरिसने ३६ धावा केल्या. यामध्ये ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अशाप्रकारे राजस्थानने अक्षरश: दिल्लीच्या हातातून सामना खेचून घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button