जून 2021 पर्यंत कोरोनावर स्वदेशी लस तयार होणार, भारत बायोटेक कंपनीचा दावा
नवी दिल्ली – ऑक्सफोर्डच्या लशीनंतर आता सर्वांच लक्ष भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लशीकडे लागलं आहे. नुकतंच या कंपनीच्या लशीला तिस-या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. दरम्यान भारत बायोटेक कंपनीने जून २०२१ पर्यंत लस उपलब्ध होईल असा दावा केला आहे. सध्या भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिनवर काम करत असून तिस-या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.
कोरोनाचा विळखा जनगभरात वाढत आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण अजूनही ५० हजारहून अधिक दर दिवसाला वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीची चाचणी देखील सध्या तिस-या टप्प्यात सुरू आहे.
हैदराबादस्थित असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडे तिस-या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लशीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लशीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते त्यामुळे जूनपर्यंत ही लस उपलब्ध करून देता येऊ शकते असं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी दावा केला आहे.
कोरोना लशीच्या निर्मितीमधील मोठा भाग हा भारतात तयार होण्याची शक्यता असल्याचं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख मार्क सुजमन यांनी सांगितलं होतं. भारत लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून पुढील वर्षापर्यंत एखादी लस बाजारात येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मजबूत खासगी क्षेत्रामुळे हे शक्य असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भारतातील मंत्र्यांनीदेखील फेब्रुवारीमध्ये लस बाजारात येण्याचा विश्वास व्यक्त केला होता.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रशियाने आपल्या स्पुटनिक-व्ही या लशीची घोषणा देखील केली होती. यावेळी या लशीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचा अहवालही जारी करण्यात आला नाही आणि आता या लशीची तिस-या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती जर्नल लॅसेंटने दिली आहे. आता तिस-या टप्यातील १० हजार स्वयंसेवकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याचबरोबर भारतात देखील या लशीचं ट्रायल घेतलं जाणार आहे.




