फडणवीस कोरोनातून बरे व्हावेत, यासाठी संजय राऊतांचे तुळजाभवानीला साकडे
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांना वारंवार काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. परिस्थिती किती गंभीर आहे, हे आज फडणवीसांना समजले असेल. फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी शिवसेनेचे संजय राऊत यांनी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असंही राऊत म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात होतो आहे. कोरोना नसता तर आज शिवतीर्थावर आज शिवसैनिकांचा महापूर दिसला असता. मनाची आणि जनाचीही लाज आहे म्हणून दसरा मेळावा सभागृहात घेत आहोत. विरोधकांनी बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही पाळली नाही. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मेळावा घेतला. भागवत आमच्यासाठी आदर्श, पण संघाच्या मेळाव्याबाबत विरोध काय काय म्हणतील ?. मुख्यमंत्री सीमोल्लंघन करणार आहेत, ते कोणत्या प्रकारचं हे संध्याकाळी समजेल. हिंदुत्व हे आमच्यासाठी लाखमोलाचे आहे.
मोफत कोरोना लसीवरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय राऊत यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लसीचं राजकारण करण्याएवढे कोत्या मनोवृत्तीचे नाहीत. नवाब मलिकांनी घोषणा केली असेल तर त्यांनी त्याबाबत चर्चा केली असेल, असं राऊत म्हणाले.





