breaking-newsताज्या घडामोडी

कोरोनाचा विळखा पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरालाही , मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कोरोनाचा विळखा आता थेट विठुरायापर्यंत जाऊन पोहचला आहे. मंदिर परिसर आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील 17 प्रभागात सध्या कंटेन्मेंट झोन असून तालुक्यातील तब्बल 27 गावात कोरोनाचा विळखा पडला आहे . यामध्ये तब्बल 21 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे . अशावेळी आता तातडीने कम्युनिटी स्प्रेड थांबवण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्याची मागणी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी केली आहे . याचसोबत कोरोनासाठी लागणारे औषधे , इंजेक्शन याच्या चढ्या भावात होणाऱ्या विक्रीवरही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी धोत्रे यांनी केली आहे .

सध्या कोरोनाची वाढती संख्या पाहता प्रशासनाला वारकरी संप्रदायाच्या मठांचा मोठा आधार मिळाला असून शहरातील 300 पेक्षा जास्त मठ ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे . या मठामध्ये नगरपालिकेच्या वतीने गाद्या पाठवण्यात येत असून अशा मठातून तब्बल तीन हजार नागरिकांना कॉरंटाईन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली आहे . सध्या शहरातील संत गजानन महाराज मठ , तनपुरे महाराज मठ याशिवाय अनेक मठात कॉरंटाईन कुटुंबे आणून ठेवण्यात आली असून जशी गरज भासेल तसे इतर मठात नागरिकांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा न भरविण्याचा निर्णय इतका अचूक होता की आताची परिस्थिती पाहता जर यात्रा भरली असती तर राज्यभर अजून मोठे संकट आले असते . सध्या शहर व तालुक्यात जवळपास 250 रुग्ण कोरोनाबाधित असून रोज सरासरी दीडशेच्या आसपास नागरिकांच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत . दुर्दैवाने अशा काळातही राजकीय साठमारीमुळे पंढरपुरात संचारबंदीचा निर्णय लाटून राहिल्याने ही संख्या रोज वाढताना दिसत आहे . अशा वातावरणात जे रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतत आहेत त्यांचे फटाके फोडून आणि फुलांच्या पायघड्या घालून जंगी स्वागतही केले जात आहे . सध्या संचारबंदी नसली तरी जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत त्यांनी समाजाची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button