ताज्या घडामोडीमुंबई

२५ नवी ‘आरोग्य केंद्रे’ महिनाभरात सुरू ; सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वेळेत कार्यरत

मुंबई | नागरिकांना घराशेजारीच प्रतिबंधात्मक आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेने आगामी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे’ सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या महिन्यात शहरात अशी २५ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. परंतु ही केंद्रे पालिकेच्या अन्य दवाखान्यांप्रमाणेच सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत.

या केंद्रांसाठी पालिकेने शहरातील २५ दवाखान्यांची निवड केली असून त्यांचा दर्जा उंचावून तेथे बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरू केले जाणार आहे. शहरातील प्रत्येक विभागामध्ये किमान एक केंद्र या महिन्याच्या अखेरीस उभारले जाईल. यासाठी आवश्यक मनुष्यबळही पालिका घेणार आहे. चाचण्या माफक दरामध्ये उपलब्ध करण्यासाठी लवकरच निविदा मागवून प्रयोगशाळांची निवड केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

या आरोग्य केंद्रामध्ये एक डॉक्टर, परिचारिका कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष, प्रतीक्षालय आणि औषधालय यांचा समावेश असेल. केंद्रामध्ये १३९ प्रकारच्या रक्त आणि इतर चाचण्या उपलब्ध असणार आहेत. यामध्ये क्ष-किरण, सीटी स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चाचण्याही अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध करण्यात येतील. शहरात, अशा १०० आरोग्य केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.

केईएम, लोकमान्य टिळक, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील विशेष आणि अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला टेलिमेडिसीनच्या माध्यमातून घेण्याची सुविधाही असणार आहे. तसेच कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजारांचे निदान वेळेत करण्यासाठी तपासणी कार्यक्रमही राबविण्यात येतील. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चाकरिता २५० कोटी रुपये तर महसुली खर्चासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्ण उपचारासाठी जातात. यामध्ये बहुतांश रोजंदारीवर काम करणारे कामगार असून यांना एक दिवसांची मजुरी बुडवून दवाखान्यात जाणे परवडणारे नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना या पालिकेच्या मोफत उपचार सेवेचा फायदा घेता येत नाही. यासाठी दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरू करण्याची मागणी प्रजा फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. २०१९ मध्ये पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर दोन दवाखाने संध्याकाळी सुरू केले. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पालिकेने आता १५ दवाखाने संध्याकाळी खुले ठेवले असून यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अन्य दवाखानेही याच पद्धतीने संध्याकाळी सुरू ठेवण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचा विचारही पालिका करीत आहे.

‘उपनगरीय रुग्णालये उपलब्ध’

पालिकेची २११ आरोग्य केंद्र आणि १८९ दवाखाने उपलब्ध असतानाही नवीन आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात येत असल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. यावर शक्य असलेल्या ठिकाणी दवाखान्यांचा दर्जा सुधारून ही केंद्रे सुरू करण्याचे पालिकेने स्पष्ट केले. नव्याने सुरू होणारी ही केंद्रे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार असल्यामुळे पालिकेच्या दवाखान्यांप्रमाणेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णही तेथील उपचारांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दुपारी ४ नंतर आरोग्य सुविधांची आवश्यकता भासल्यास उपनगरीय किंवा प्रमुख रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यामुळे उशिरापर्यंत ही केंद्रे सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब आरोग्य केंद्रे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार असतील तर घराशेजारी सुविधा उपलब्ध असूनही रोजंदारीवरील कामगारांना याचा फायदा घेता येणार नाही. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांनाच जर पालिकेची आरोग्य व्यवस्था सामावून घेणार नसेल तर ही नवी केंद्र उभारण्याचा मूळ उद्देशच मागे पडेल. या केंद्रांचा फायदा रुग्णांना व्हावा यासाठी ती संध्याकाळीही सुरू ठेवण्याचा विचार पालिकेने करणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button