मुंबई पुस्तक महोत्सव ठरणार संवेदना आणि मानवतेचा उत्सव!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे उद्घाटन; ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे आणि ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

मुंबई : पुस्तकांना आणि ग्रंथांना भौगोलिक सीमा नसतात. भारतीय परंपरेत ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, पुस्तके आणि ग्रंथांमध्ये समाज घडविण्याची अभूतपूर्व ताकद आहे. समृद्ध आणि प्रगल्भ समाजाच्या निर्मितीत ग्रंथांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सव हा संवेदनांचा आणि मानवतेचा महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागाने आयोजित ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दालनासह पुस्तकांच्या दालनाला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्यांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुख्य आयोजक आमदार अमित साटम, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार पराग अळवणी, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषा मुंबईने जपली
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मनोरंजन आणि फिनटेक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्रही आहे. मुंबईत कला, साहित्य आणि संस्कृतीला नेहमीच पोषक वातावरण मिळाले आहे. अनेक नामवंत साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि विचारवंत मुंबईने देशाला दिले आहेत.
मराठी संस्कृती, अस्मिता आणि भाषा मुंबईने जपली आहे. त्यामुळेच मुंबईची संस्कृती अनोखी आहे. अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था मुंबईत सुरू झाल्या. या संस्थांनी मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’ हे नियतकालिक मुंबईतच सुरू झाले. त्यातून ज्ञानाचे नवे दालन खुले झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपली विविध नियतकालिके मुंबईतून सुरू करून वंचितांचा आवाज बुलंद केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य रशियापर्यंत पोहोचले. हे ग्रंथ आणि पुस्तकांच्या चळवळीमुळेच शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.
‘एआय’च्या जगातही ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण
आपल्याकडील नालंदा विद्यापीठाची ग्रंथसंपदा अतिशय विपुल होती. सर्व विषयांतील ज्ञानाचा मोठा खजिना या ग्रंथसंपदेत समाविष्ट होता. आज आपण ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातही ज्ञानाचे आणि ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तंत्रज्ञानाला मूल्यसंवेदना समजू शकत नाहीत. त्यासाठी मानवी संवेदनांची आवश्यकता असते. ग्रंथसंपदेच्या समृद्ध वारशामुळेच आपण यंत्रवत झालेलो नाही. ‘ज्ञान भारतम्’च्या माध्यमातून प्राचीन हस्तलिखिते जतन करण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा – पाच हजारांची अग्रीम रक्कम आणि नमो शेतकरी योजना एकच आहे का?
पुस्तक महोत्सव दरवर्षी मुंबईत होणार
पुस्तके आणि ग्रंथ हे आपले खरे मित्र आहेत. ते व्यक्तिमत्त्व घडवतात आणि संवेदना जागृत ठेवतात. मुंबईत आयोजित करण्यात आलेला हा पुस्तक महोत्सव मुंबईकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यापुढे हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जाईल आणि मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनेल. महोत्सवाला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता वाचनसंस्कृती टिकून राहील, असा विश्वास वाटतो. हा महोत्सव अनेक विक्रम मोडीत काढेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे म्हणाले, भारतीय परंपरेत ज्ञानसाधनेला मोठे महत्त्व आहे. विकसित भारताचा पाया प्रगल्भ वाचकांमुळे अधिक मजबूत होऊ शकतो. मुंबई पुस्तक महोत्सव मुंबईकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरेल.
मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांनी मुंबई पुस्तक महोत्सवासारखे आयोजन ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला बळकटी देणारे असल्याचे सांगितले. मुख्य आयोजक आमदार अमित साटम यांनी वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत व्यक्त केले. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी आभार मानले.
साहित्य, कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव
वाचनसंस्कृतीचा प्रसार, साहित्यिक विचारांची देवाणघेवाण आणि नव्या पिढीला पुस्तकविश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात साहित्य, शिक्षण, कला आणि संस्कृती क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.
महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे, बालकांसाठी २० हून अधिक उपक्रम आणि ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील गेट क्रमांक २ येथून महोत्सवात प्रवेश करता येणार आहे.
लेखक मंचावर साहित्यिकांची मांदियाळी
महोत्सवातील ‘लेखक मंच-१’ हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या मंचावर साहित्यिक चर्चा, विचारमंथन आणि लेखकांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य, समकालीन लेखन, नाटक, इतिहास, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर सत्रे होणार आहेत. नामवंत लेखक, साहित्यिक आणि विचारवंत त्यात सहभागी होणार आहेत.
मराठी लेखक मंचावर ५० सत्रे
मराठी साहित्यप्रेमींसाठी ‘लेखक मंच-२’ अर्थात मराठी मंच हे स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या मंचावर एकूण ५० सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि समकालीन सामाजिक विषयांवर या माध्यमातून चर्चा होणार आहे.
बालकांसाठी विशेष उपक्रम
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन, प्रश्नमंजुषा आणि विविध सर्जनशील स्पर्धांचा यात समावेश आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
साहित्यिक चर्चांसोबतच महोत्सवात संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त, महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विशेष प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.




