TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या OTS टप्प्याची पहिली यादी जाहीर! १.६९ लाख शेतकरी पात्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ; पात्र शेतकऱ्यांनी बँकेत भरायची रक्कम तपासण्याचे आवाहन

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील एकवेळ समझोता (OTS) घटकासाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची पहिली यादी सहकार विभागाने जाहीर केली आहे. ही यादी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी करण्यात आली. याअंतर्गत २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे.

OTS योजनेत २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ

एकवेळ समझोता घटकांतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या २ लाख रुपयांवरील कर्जाच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे. त्यानंतर शासनाकडून २ लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे संगणकीय संस्करण केल्यानंतर १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँकेचे नाव व शाखा, विकास संस्थेचे नाव, कर्जखाते क्रमांक, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, OTS नुसार थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा –  राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर; दोन G20 छायाचित्रांतून मोदी सरकारची बाजू मांडली!

यादी कुठे पाहता येणार?

OTS अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपल्या नावासह कर्जखात्याचा तपशील आणि भरावयाची रक्कम तपासून घ्यावी.

शेतकऱ्यांनी OTS नुसारच रक्कम जमा करावी

पात्र शेतकऱ्यांनी यादीमध्ये नमूद केलेली OTS नुसार बँकेला देय असलेली रक्कम संबंधित बँकेत जमा करावी. एकाच बँकेत कर्जखाते असलेल्या शेतकऱ्यांनी यादीत नमूद केलेली रक्कम संबंधित कर्जखात्यात भरावी. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात ही रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मात्र, संबंधित खात्यात OTS नुसार बँकेला देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे जमा करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दर शुक्रवारी पोर्टलवर माहिती अद्ययावत होणार

शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकांकडून पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. ही माहिती दर शुक्रवारी पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आवश्यक रक्कम जमा केल्याची खातरजमा झाल्यानंतर आणि थकबाकीची माहिती अद्ययावत केल्यापासून तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यामुळे OTS यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा किंवा विकास संस्थेशी संपर्क साधून आपली पात्रता, भरावयाची रक्कम आणि पुढील प्रक्रिया तपासून घ्यावी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group