TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्रीवर FDAचा कडक वॉच! नियम मोडल्यास १० लाखांचा दंड; मृत्यू झाल्यास जन्मठेपेची तरतूद

जिम, केमिस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनाही नियमावली लागू; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर होणार कारवाई

मुंबई : तरुणाईमध्ये वाढती बॉडीबिल्डिंगची क्रेझ आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींमुळे हेल्थ सप्लिमेंट्सच्या वापरात वाढ होत आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याविना अशा उत्पादनांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहार उत्पादनांच्या विक्री व जाहिरातींसाठी कडक नियमावली लागू केल्याची घोषणा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केली.

बाजारात प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन गोळ्या, वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल प्रोडक्ट्सची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र, काही उत्पादनांमध्ये प्रत्यक्ष घटक वेगळे असतानाही त्यांची विक्री दुसऱ्याच नावाने केली जात असल्याचे प्रकार १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत निदर्शनास आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिम, केमिस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना नियमावली लागू

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही नियमावली हेल्थ सप्लिमेंट्सचे उत्पादक, पुरवठादार, वितरक, आयातदार, औषध विक्रेते, जिम आणि हेल्थ सेंटर्स यांना लागू असेल. संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक FDA परवाना घेणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  कार्तिकी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज! पंढरपूर यात्रेसाठी १ हजार जादा बसेस धावणार

सोशल मीडियावरील जाहिरातींवरही लक्ष : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सकडून प्रोटीन पावडर, वजन कमी करणे किंवा चेहऱ्यावर ग्लो आणणे यांसारखे दावे करून उत्पादनांची जाहिरात केली जाते. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. लहान मुले, गर्भवती महिला, रुग्ण आणि खेळाडू यांनी वैद्यकीय सल्ल्याविना अशा उत्पादनांचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्लिमेंट्स म्हणजे औषध नव्हे : हेल्थ सप्लिमेंट्स ही दैनंदिन आहाराला पूरक उत्पादने आहेत. ती कोणत्याही आजारावरील उपचार किंवा औषधांचा पर्याय नाहीत. प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक आणि इतर घटकांच्या वापरासंदर्भात लागू नियमांनुसार आवश्यक पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नियम मोडल्यास १० लाखांपर्यंत दंड; मृत्यू झाल्यास जन्मठेपेची तरतूद

नियमावलीचे उल्लंघन, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि परवान्याविना व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, सप्लिमेंट्सच्या सेवनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी आकर्षक जाहिरातींना बळी पडून कोणतेही सप्लिमेंट स्वतःहून घेऊ नये. उत्पादनाची माहिती, घटक आणि वैधता तपासावी तसेच आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमबाह्य किंवा बनावट सप्लिमेंट्सची विक्री आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group