भिवंडीत FDA ची मोठी कारवाई! DXP Ventures च्या गोदामातून 2.06 कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त
पॅकेजिंगवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी डेट आणि MRP मध्ये फेरफार केल्याचा संशय; कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित

भिवंडी : भिवंडीतील अर्जुनाळी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. DXP Ventures India Pvt. Ltd. या कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तब्बल 2 कोटी 6 लाख 21 हजार रुपये किमतीचा खाद्यपदार्थ आणि पेयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्यात शीतपेय, एनर्जी ड्रिंक, सोडा, जिंजर सोडा आणि A2 बिलोना देशी तुपासह एकूण 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. पॅकेजिंगवरील उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख आणि कमाल किरकोळ किंमत (MRP) यामध्ये फेरफार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधित कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे गोदामावर छापा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त योगेश ढाणे यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनाळी येथील घर क्रमांक 790, C-1 इमारतीतील युनिट क्रमांक 11 ते 17 मध्ये असलेल्या कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान थिनरच्या सहाय्याने खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील मूळ उत्पादन तारीख आणि MRP पुसून त्यावर नव्याने स्टॅम्पिंग केले जात असल्याचा प्राथमिक संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणात कंपनीचे पर्यवेक्षक आणि अन्न व्यवसाय संचालक (FBO) कृष्णकुमार पुनिया यांचे नाव प्रशासनाच्या कागदपत्रांत नमूद असल्याची माहिती आहे.
14 प्रकारचे खाद्यपदार्थ जप्त
या कारवाईत स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक, सौदी कॉकटेल, सोडा, प्रीमियम सोडा वॉटर, जिंजर सोडा आणि A2 बिलोना देशी तुपासह एकूण 14 प्रकारचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत 2 कोटी 6 लाख 21 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक निरीक्षणांमध्ये या कायद्यातील कलम 23, 26 आणि 27 च्या संभाव्य उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. जप्त केलेला माल यापूर्वी बाजारात वितरित झाला होता का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध प्रशासन घेत आहे.
डॉ. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक आयुक्त योगेश ढाणे, सहआयुक्त डॉ. सचिन जाधव, अन्न सुरक्षा अधिकारी के. वाय. चिपळूणकर आणि ए. व्ही. कांडेलकर सहभागी झाले होते. जप्त साठा आणि संबंधित कागदपत्रांची पुढील तपासणी सुरू आहे.
दरम्यान, खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील तारखा किंवा किमतीमध्ये फेरफार झाल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. तसेच कालबाह्य पदार्थ बाजारात पोहोचल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी कारवाया सुरू आहेत.




