TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दुष्काळी नांदेडसाठी सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश; २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास बंदी

चारा व्यवस्थापनासाठी ३ कोटींचा निधी; १४ हजार शेतकऱ्यांना चारा वाटप, सक्तीच्या कर्जवसुलीला मनाईचे निर्देश; धर्माबादमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

नांदेड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत पाणी आणि चारा व्यवस्थापनासह भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत त्यांनी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रब्बी पेरणी, चारा नियोजन आणि रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यावर बंदी घालण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शासन दुष्काळाच्या परिस्थितीत नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पाणी व चारा उपलब्धतेचे नियोजन केले जात आहे. या उपाययोजनांचा आपण स्वतः आढावा घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

२०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास मनाई

भूजल पातळी टिकविण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी २०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदण्यावर कडक निर्बंध घालण्याचे निर्देश देण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी नियमानुसार पाणी राखीव ठेवावे, असेही प्रशासनाला सांगण्यात आले. जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने कामाला सुरुवात झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

हेही वाचा –  नागपूरचे नामांतर ‘दीक्षाभूमी’ करा; संजय राऊतांची मागणी, उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा

चारा व्यवस्थापनासाठी ३ कोटींचा निधी

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. आतापर्यंत १४ हजार शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीटंचाई निवारणासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याची चर्चा

कृषी विभागाच्या एका बैठकीत लोकप्रतिनिधींच्या अल्पोपहाराबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नांदेडमधील या दुष्काळ आढावा बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र, पत्रकारांना प्रवेश नाकारण्यामागील अधिकृत कारण बैठकीच्या माहितीत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

धर्माबादमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा

दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने बाभळी बंधारा आणि इळेगाव नदीपात्रातील उपलब्ध जलसाठा जानेवारीपर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरातील दररोजचा पाणीपुरवठा ३ दशलक्ष लिटरवरून कमी करून दीड दशलक्ष लिटर करण्यात आला आहे. धर्माबाद शहराची लोकसंख्या सुमारे ४२ हजार ५०० असून, पाणीपुरवठ्यासाठी ३ हजार नळजोडण्या, ९५ बोअरवेल आणि ३३ हातपंपांचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.

नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group