Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दुष्काळाकडे जलसंधारणाची संधी म्हणून पाहा; प्रत्येक गावाने लोकसहभागातून कामे करावीत – मंत्री जयकुमार गोरे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसंधारणाला सर्वाधिक गुण; उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव, दाटेगावला १ कोटींचे पारितोषिक

छत्रपती संभाजीनगर : विकसित महाराष्ट्राचे स्वप्न ग्रामीण भागातील गावे समृद्ध झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेले लोकचळवळीचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे जलसंधारणाची व्यापक कामे करण्याची संधी म्हणून पाहावे. प्रत्येक गावाने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन दुष्काळावर मात करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ संदर्भातील विभागीय कार्यशाळा आणि ‘दुष्काळावर मात व समृद्ध गावाचा संकल्प’ या विषयावरील परिसंवाद केंब्रिज स्कूल चौक मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गोरे बोलत होते.

यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जलसंधारणाच्या कामांना अभियानात सर्वाधिक गुण

जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायती सक्षम करणे, गावातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि जलसंधारणाचा विकास करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागाची चळवळ उभी राहिली होती. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसंधारणाच्या कामांना सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

अभियानातील पुरस्कारांसाठी ग्रामपंचायतींच्या कामांचे निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यात आले असून, प्रत्येक गावातील कामांची तीन वेळा तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार मिळविण्यापेक्षा गाव समृद्ध करणे महत्त्वाचे आहे. पुरस्कार न मिळालेल्या ग्रामपंचायतींनी निराश न होता अधिक जोमाने काम करावे. प्रशासक नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतींनीही अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा –  भिवंडीत FDA ची मोठी कारवाई! DXP Ventures च्या गोदामातून 2.06 कोटींचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त

पहिल्या टप्प्यातील विकासकामांची आकडेवारी

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ हजार ७४६ ग्रामपंचायती सहभागी झाल्या. या अभियानातून सुमारे ६९ लाख आयुष्मान भारत कार्डे आणि १ लाख १० हजार दिव्यांगांना ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या वेबसाइट तयार करण्यात आल्या, तर ४ हजार ४७ ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

अभियानाच्या कालावधीत ३ लाख ५९ हजार घरे पूर्ण झाली. घरकुलासाठी जागा नसलेल्या ५४ हजार ४७७ भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली. विविध योजनांच्या समन्वयातून २ हजार ७०६ किलोमीटर गावांतर्गत रस्ते आणि २ हजार ७३० किलोमीटर पाणंद रस्त्यांची कामे करण्यात आली.

याशिवाय ५ हजार ११८ स्मशानभूमींमध्ये सुविधा, २ हजार ३७८ गावांमध्ये व्यायामशाळा आणि ४ हजार २८२ गावांमध्ये वाचनालये उपलब्ध करून देण्यात आली. तसेच १३ हजार २३९ शाळांमध्ये मुलांसाठी आणि १२ हजार ४८७ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालयांची सुविधा निर्माण करण्यात आली. अभियानाच्या कालावधीत ८१५ कोटी रुपयांची घरपट्टी आणि २४१ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुमारे ६७ लाख वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती गोरे यांनी दिली.

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळमुक्तीसाठी प्रत्येक गावाने पुढाकार घ्यावा – अतुल सावे

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाने पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याचा संकल्प करावा. ‘जलतारा’ शोषखड्डे, तलाव व विहिरींमधील गाळ काढणे, बोअरवेल पुनर्भरण, जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. नदीजोड आणि वॉटर ग्रीडसारखे प्रकल्प भविष्यातील जलसुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत.

ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेचा वापर वाढवावा. शेतीसाठी सौरपंप आणि घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून विजेच्या खर्चात बचत करावी. उत्कृष्ट ग्रामपंचायतींना मिळालेले पुरस्कार हे गावातील एकजूट, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभाराची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसहभाग हाच अभियानाचा गाभा – योगेश कदम

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरावरील विविध योजनांचा समन्वय साधला जात आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना गती मिळत असून नागरिकांमध्ये योजनांविषयी जागरूकता वाढत आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि पाणीसाठवणुकीची कामे लोकसहभागातून करणे आवश्यक आहे. दापोली तालुक्यात लोकसहभागातून शासनाच्या निधीचा वापर न करता सुमारे १ हजार १०० वनराई बंधारे उभारण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. कोणतेही अभियान नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

दुष्काळावर मात करण्यासाठी लोकचळवळ आवश्यक – मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव समृद्ध होणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी महिला बचत गट, लखपती दीदी, तरुण पिढी, सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासनाच्या सहभागातून लोकचळवळ उभी करावी.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावाच्या विकासाचा आदर्श आणि ‘जलतारा’ जलसंधारण उपक्रमाची संकल्पना गावागावांत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग बंधनकारक

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग बंधनकारक करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० पैकी किमान ७० गुण मिळविणे आवश्यक आहे. अभियानातील आठ प्रमुख घटकांची ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती देऊन नागरिकांचा सहभाग वाढवावा.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणाचा नसून दुष्काळावर मात करून प्रत्येक गाव समृद्ध करण्याची संकल्पसभा असल्याचे सांगितले. कार्यक्रमस्थळी सुमारे २ हजार ६०० ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. तसेच मराठवाड्यातील ७ हजार ६८९ ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

विभागीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. या ग्रामपंचायतीला १ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर), ता. निलंगा ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवून ८० लाख रुपयांचे, तर बीड जिल्ह्यातील वंजरवाडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवून ६० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये लाडगाव/हिवरा ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवून ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवून ३० लाख रुपये, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवून २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

जलतारा शोषखड्डे आणि गुणांकनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी तथा यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अभियानातील विविध गुणांकन निकषांबाबत मार्गदर्शन केले. पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि हिवरे बाजारचे प्रवर्तक पोपटराव पवार यांनी दुष्काळी परिस्थितीतही ग्रामपंचायतींनी अभियानात प्रभावी सहभाग कसा घ्यावा, याविषयी माहिती दिली. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी ‘जलतारा’ शोषखड्ड्यांची निर्मिती आणि जलसंधारण प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींचा सहभाग

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अभियानाच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले. हिंगोली जिल्ह्यातील ५६३ पैकी ११८ ग्रामपंचायती मागील अभियानात सहभागी झाल्या होत्या. मात्र, नव्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर आयुक्त सुषमा देसाई यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group