८०० कोटींहून अधिक कमाई करणारा ‘जेलर २’ आता ओटीटीवर! जाणून घ्या कुठे आणि कधी पाहाल?

Jailer 2 OTT Release Date | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आता हा बहुचर्चित चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. जागतिक पातळीवर तब्बल ८०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवणारा हा अॅक्शन-क्राईम ड्रामा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरपासून लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडिओ’वर (Amazon Prime Video) प्रदर्शित होत आहे. प्राइम व्हिडिओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही घोषणा केली आहे.
प्राइम व्हिडिओने यासंदर्भात पोस्ट शेअर करताना, “टायगर मुथुवेल पांडियन पुन्हा एकदा परतला आहे, अधिक दमदार अंदाजात!” अशी कॅप्शन देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या १२ नोव्हेंबरपासून हा चित्रपट मूळ तमिळ भाषेसह हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये घरबसल्या स्ट्रीम करता येणार आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली आणि कलानिधी मारन (सन पिक्चर्स) यांच्या निर्मितीखाली बनलेला हा सिक्वेल चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
हेही वाचा
‘गोकुळ’ अमूलच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल
रजनीकांत यांच्या मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटात मोहनलाल, हृतिक रोशन आणि विजय सेतुपती यांची विशेष उपस्थिती (कॅमिओ) आहे. याशिवाय एस. जे. सूर्या, शिवराजकुमार, सूरज वेंजारामूडू, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, रम्या कृष्णन, नामो नारायण आणि योगी बाबू यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
बॉक्स ऑफिसवर ८२१ कोटींची ऐतिहासिक घोडदौड
चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड अद्यापही सुरू असून, ताज्या आकडेवारीनुसार प्रदर्शनाच्या २१व्या दिवशी (४ नोव्हेंबर) चित्रपटाने भारतात ३ कोटींची कमाई केल्याने देशांतर्गत निव्वळ कमाई ४६६.०५ कोटी रुपये तर एकूण ग्रॉस कमाई ५४५.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे; तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत तब्बल २७६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन झाल्याने, भारत आणि परदेश मिळून ‘जेलर २’ चे एकूण जागतिक ग्रॉस कलेक्शन तब्बल ८२१.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.




