‘गोकुळ’ अमूलच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई | कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करून शेतकऱ्यांनी दिलेली सत्ता चोरण्याचा घाट घातला आहे, असा थेट आणि गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. सहकार कायद्यातील बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून ‘गोकुळ’वर मागील दाराने ५ संचालक नेमणे आणि त्यातील चौघांना मतदानाचा अधिकार देणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी टीका त्यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. तसेच हा संपूर्ण आटापिटा ‘गोकुळ’ला गुजरातमधील ‘अमूल’च्या घशात घालण्यासाठीच सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत सतेज पाटील म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने २५ पैकी १३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर महायुतीला १२ जागांवर रोखले. हा पराभव महायुतीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. “गोकुळवर कोल्हापुरातील साडेपाच लाख शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. दर १० दिवसांनी १०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घामाचे दिले जातात आणि रोज २० लाख लिटर दूध संकलित होते. अमूलनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा मोठा संघ आहे. मात्र, महायुती सरकार शेतकऱ्यांनी दिलेला हा स्पष्ट जनादेश धुडकावून लावत आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला चाललाय! ‘गोकुळ’ दूध संघ निकालांवरून राहुल गांधींचा घणाघात
हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील षडयंत्राचे सूत्रधार
सहकार कायद्यात बदल करून संचालक लादण्यामागे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाच प्रमुख हात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. “या दोघांनीच हे संपूर्ण षडयंत्र रचले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बेकायदेशीर निर्णयाविरोधात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांपैकी कोणीही चकार शब्द काढला नाही; म्हणजेच या दोन्ही पक्षांचीही या मनमानी कारभाराला मूकसंमती आहे. ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवण्यासाठीच पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
“गोकुळचे पदार्थ शेवटचे खाऊन घ्या”; मिश्किल पण बोचरी टीका
सरकारवर निशाणा साधताना सतेज पाटील यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “मी येताना पत्रकारांसाठी गोकुळचे प्रसिद्ध गुलाबजाम आणि श्रीखंड आणणार होतो, पण ते राहून गेले. गोकुळचे नाव असलेले हे ब्रँडेड पदार्थ तुम्ही शेवटचेच पाहून आणि खाऊन घ्या; कारण लवकरच या पदार्थांवर ‘अमूल’चे स्टिकर लावून गोकुळ त्यांच्या ताब्यात देण्याची सर्व तयारी महायुती सरकारने पूर्ण केली आहे.”




