Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती; योजनांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश

शिष्यवृत्ती, १६ प्रकारच्या शैक्षणिक शुल्कांची प्रतिपूर्ती आणि परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ; जिल्हास्तरावर चालक-वाहक प्रशिक्षण योजना राबवणार.

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि विविध सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करून योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे सदस्य मंत्री ॲड. आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उपसमितीचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक सवलतींसाठी शासन निर्णय तातडीने काढण्याचे निर्देश

मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व शासन निर्णय तातडीने काढावेत, असे निर्देश विखे पाटील यांनी संबंधित विभागांना दिले. प्रस्तावित शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांसाठी निधीची आवश्यकता असल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांसाठी ९,७०० कोटींचा निधी वितरित; प्रलंबित देयकांचा मार्ग मोकळा

१६ प्रकारच्या शुल्कांची प्रतिपूर्ती; विद्यार्थिनींनाही शिष्यवृत्ती

इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना लागू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

शिक्षण शुल्काव्यतिरिक्त प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क अशा एकूण १६ बाबींच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याची तरतूदही या निर्णयात आहे. OBC विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सवलती मिळण्याची पात्रता आहे, त्या अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र ठरणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील शिक्षणाचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

चालक-वाहक प्रशिक्षण योजना जिल्हास्तरावर राबवणार

मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेली मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना केवळ पुणे शहरापुरती मर्यादित न ठेवता जिल्हास्तरावर राबवावी, असे निर्देशही विखे पाटील यांनी दिले. यासाठी ‘सारथी’ संस्थेने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवावेत, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत सचिव आप्पासो धुळाज यांनी विविध योजनांचे सादरीकरण केले. संबंधित विभागांनी समन्वय साधून योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर कराव्यात, यावर बैठकीत भर देण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group