Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

ग्रामीण खेळाडूंना जागतिक संधींचे दालन खुले; मुख्यमंत्री फडणवीस यांचा क्रीडा विकासावर भर

पुण्यात मुख्यमंत्री चषक स्पर्धेचा समारोप; मुलींच्या गटात तामिळनाडू, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेश ठरले विजेते

पुणे : ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून देशातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत असून, खेळ ग्रामीण भागातील गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या (मुख्यमंत्री चषक) समारोपप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेच्या मुलींच्या गटात तामिळनाडूने, तर मुलांच्या गटात उत्तर प्रदेशने विजेतेपद पटकावले.

यावेळी आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकर जगताप, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त दीपक सांगला, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘मिशन लक्ष्यवेध’मधून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण

महाराष्ट्राच्या क्रीडा परिसंस्थेमध्ये बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ‘खेलो इंडिया’ स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून पदके मिळवत आहेत. राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून विविध खेळांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू केली आहेत, असे त्यांनी सांगितले.

बास्केटबॉल हा महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळ असून, राज्याने देशाला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहेत. अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे खेळाडूंना अनुभव मिळतो आणि राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखविण्याची संधी उपलब्ध होते. महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला.

खेळाडूंची जिद्द आणि मेहनत महत्त्वाची

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारताने यावेळी ४८ पदके मिळविली असून, १७ राज्यांतील खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे. कबड्डी, नेमबाजी आणि तिरंदाजीसारख्या खेळांमध्ये सामान्य कुटुंबांतील खेळाडूंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविले.

खेळाडूंची परिस्थिती नव्हे, तर त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असते. पराभवानंतर खचून न जाता सातत्याने प्रयत्न करणारे खेळाडूच भविष्यात यशस्वी होतात, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा –  सुट्या खाद्यतेल विक्रीला आणखी वर्षभर मुदतवाढ; दिवाळीत व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा

पराभवातून शिकून पुढील स्पर्धेसाठी तयारी करा

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विजेत्या आणि संघांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्राचा संघ यंदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नसला, तरी त्यातून निराश होण्याचे कारण नाही. खेळात जय-पराजय होत असतो. पुढील स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी खेळाडूंना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

खेळाडूंमध्ये जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि खिलाडूवृत्ती असणे आवश्यक आहे. पराभवानंतरही न थांबता प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंनाच भविष्यात विजय मिळविण्याची संधी असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय स्पर्धेतून देशाच्या एकात्मतेचे दर्शन

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध राज्यांतील संघांमुळे भारतातील वैविध्य आणि एकात्मतेचे दर्शन घडते. दक्षिण आणि उत्तर भारतातील खेळाडू एकत्र येऊन देशाच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव सुबिंदर सिंह गिल यांनी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या माध्यमातून मुलांच्या आणि मुलींच्या संघांची राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सातत्याने उंचावत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय पदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, असे ते म्हणाले.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येत असलेल्या बास्केटबॉल स्टेडियममध्ये आगामी काळात राष्ट्रीय स्पर्धेबरोबरच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा गिल यांनी व्यक्त केली.

मुलींच्या गटात तामिळनाडू, मुलांच्या गटात उत्तर प्रदेश विजेता

४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात वैयक्तिक आणि सांघिक गटांतील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

  • मुलींचा गट : तामिळनाडू – विजेता; कर्नाटक – उपविजेता.
  • मुलांचा गट : उत्तर प्रदेश – विजेता; मध्य प्रदेश – उपविजेता.

यावेळी जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या यशदीप भोगे यांचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेमुळे देशभरातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group