Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विकसित भारत २०४७’साठी ग्रामीण उद्योगांना नवी भरारी; खादी-ग्रामोद्योगाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करा

 ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात ११ उद्योजकांचा गौरव; पुढील वर्षापासून पुरस्कारांच्या रोख रकमेची दुप्पट वाढ करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्ये, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी उपयोग करून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेशी सुसंगत सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. लोकभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध जिल्ह्यांतील यशस्वी ग्रामोद्योग उद्योजकांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ करीत असलेल्या कामाचे कौतुक करून त्यांनी पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले.

पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या

ग्रामीण उद्योजकांनी पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या उद्योगांचा विस्तार करावा आणि त्यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे राज्यपाल म्हणाले. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘मधाचे गाव’ उपक्रमाचा विस्तार; ५.०२ कोटींची तरतूद

मंडळाच्या ‘मधाचे गाव’ या उपक्रमाचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. महागाव आणि कडगावच्या धर्तीवर राज्यातील आणखी दहा गावांचा ‘मधाचे गाव’ म्हणून विकास करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने ५ कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

मधमाशीपालन आणि मध उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. या उपक्रमाचा प्रभावी विस्तार करण्यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, मध प्रक्रिया, पॅकेजिंग आणि विपणन सुविधांवर विशेष भर देण्याची सूचना राज्यपालांनी केली.

हेही वाचा –  ग्रामीण खेळाडूंना जागतिक संधींचे दालन खुले; मुख्यमंत्री फडणवीस यांचा क्रीडा विकासावर भर

खादी उत्पादनांना आधुनिक बाजारपेठ उपलब्ध करून द्या

खादीचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खादी उत्पादने अधिक दर्जेदार, आकर्षक आणि स्पर्धात्मक बनविण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली.

मुंबईत दरवर्षी महिनाभराचा ‘महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. या महोत्सवात उत्पादन प्रदर्शन, फॅशन शो आणि खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करावे. विमानतळांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करावे. यामुळे स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे वर्मा यांनी सांगितले.

पुरस्कारांच्या रोख रकमेत दुप्पट वाढ करणार : उदय सामंत

खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुढील वर्षापासून ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कारां’च्या रोख पारितोषिकांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

केवळ पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन अवघ्या दोन ते तीन वर्षांत २५ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकाची यशोगाथा प्रेरणादायी आहे. अशा यशस्वी उद्योजकांना खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ बनविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र परकीय थेट गुंतवणूक (FDI), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) आणि स्टार्टअप क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. राज्यात गुंतवणूक प्रस्तावांच्या अंमलबजावणीचे प्रमाणही अधिक असल्याचे सामंत यांनी नमूद केले. औद्योगिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने तंत्ररत्न, पीएम विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नवउद्योजक आणि स्टार्टअप निर्माण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारांची भूमिका

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी पुरस्कार योजनेची भूमिका स्पष्ट केली. मंडळामार्फत २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार’ योजनेचा उद्देश शासकीय योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या आणि इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन व सन्मान देणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात स्वयंरोजगार आणि उद्योगनिर्मितीला चालना मिळणे आवश्यक आहे. यंदा ११ उद्योजकांचा गौरव करण्यात येत असून, त्यांच्या यशोगाथांचे पुस्तक प्रकाशित करून ते राज्यभर पोहोचविण्यात येणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

२०२५ च्या पुरस्कारप्राप्त उद्योजकांचा गौरव

२०२५ च्या पुरस्कारांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ‘प्रगत महिला गृह उद्योग’च्या रक्षा रमेश वागे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘लक्ष्मी कॅशू’ या काजू बी प्रक्रिया उद्योगाचे संदेश परशुराम दळवी यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये, तर धुळे जिल्ह्यातील ‘सारवा इलेक्ट्रेक’ या मशीन मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाचे दर्शन गोपालदास यादव यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.

उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील ‘जागृती हळद पावडर’ उद्योगाच्या संगीता लालासो भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘स्वयंम संयुक्त देयता समूह’च्या मिनल सचिन देसाई, नाशिक जिल्ह्यातील ‘व्यंकटेश आर्टर्स स्टुडिओ’चे विष्णू मोतीराम पवार आणि वाशिम जिल्ह्यातील ‘जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’चे कृष्णा ज्ञानबा चौधरी यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

२०२६ च्या पुरस्कारप्राप्त उद्योजकांची नावे

२०२६ च्या पुरस्कारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ब्राम्हनाथ फार्मा’ उद्योगाचे पारस दिलीप गोलेचा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील ‘बारामती इको सिस्टम’ उद्योगाच्या तेजल अभिमन्यू नागवडे यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये, तर सांगली जिल्ह्यातील ‘मंगलमूर्ती फूड इंडस्ट्रीज’चे हर्षद नामदेव सुवर्णवंशी यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील ‘वैभव क्रिएशन’ या मूर्तीकाम उद्योगाचे वैभव सुभाषराव मानकर यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, अपर जिल्हाधिकारी तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group