राजमाता जिजाऊ कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित ‘स्टार्टअप टॉक २.०’ उत्साहात संपन्न; १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

डूडुळगाव | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, डुडुळगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू), पुणे प्रायोजित ‘स्टार्टअप टॉक २.०’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात सिरी संस्थेचे सहसंस्थापक श्री. सचिन कुंभोजे यांनी ‘तरुण नवकल्पकांसाठी उद्योजकतेच्या संधी’ या विषयावर, तर कॅलिडस रिसर्च लॅबोरेटरीज, पुणेचे सहसंस्थापक श्री. शैलेश बी. शिंदे यांनी ‘औषधनिर्माण क्षेत्रातील कल्पनेपासून उद्योगनिर्मितीपर्यंतचा प्रवास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्टार्टअपच्या विविध संधी, व्यवसाय उभारणीतील आव्हाने, नावीन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिक रूपांतर आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये यांविषयी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज (सीआयआयई) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृती विकसित करणे हा आहे. विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या अनुभवांतून प्रेरणा घेण्याची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाली.
हेही वाचा
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार मा. श्री. विलास लांडे, संस्थेचे सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित गव्हाणे, विश्वस्त मा. श्री. विक्रांतजी लांडे, मा. श्री. सुमित मुंगसे तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा. किरण चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रवीण जे. पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल बी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता स्वतःच्या नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) आणि स्टार्टअप इंडिया या संकल्पनांशी सुसंगत असून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सीआयआयई केंद्र, प्रमुख वक्ते, आयोजन समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




