महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या; ठाणे, सांगली, सोलापूरसह पोलीस यंत्रणा अलर्ट
धमकीचे ई-मेल मिळताच न्यायालये रिकामी; बॉम्ब शोधक पथकांकडून तपासणी, ई-मेल पाठवणाऱ्याचा सायबर पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे संदेश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी न्यायालयीन इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून, बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि श्वान पथकांकडून तपासणी सुरू आहे. धमकीचे ई-मेल कोणी आणि कुठून पाठवले, याचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.
ठाणे न्यायालयाला धमकीचा ई-मेल; दोन्ही इमारती रिकाम्या
ठाणे जिल्हा न्यायालयात आयईडी स्फोट घडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या प्रकरणी ठाणे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ९.४३ वाजता धमकीचा संदेश प्राप्त झाला. न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आणि दुपारी ३.११ वाजता त्याचा स्फोट होणार असल्याचा उल्लेख पंजाबी भाषेतील संदेशात होता.
ई-मेल मिळताच मानक कार्यपद्धतीनुसार न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या. इमारतींमधील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिसरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर नागरिकांना नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून दोन्ही इमारतींचे सर्व मजले, पार्किंग क्षेत्र, कॅन्टीन आणि परिसराची तपासणी करण्यात येत आहे. गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, धमकीच्या ई-मेलमध्ये २७ नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात स्फोट घडवण्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री ९.११ वाजता स्फोट घडवण्याची धमकीही देण्यात आल्याचा दावा आहे. १९८४ मधील घटनेचा बदला घेण्याचा उल्लेख आणि दिलजीत दोसांझ यांच्या २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमालाही लक्ष्य करण्याची धमकी ई-मेलमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व दाव्यांची पोलीस यंत्रणांकडून पडताळणी सुरू आहे.
सांगली जिल्हा न्यायालयातही तपासणी
सांगली जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक न्यायालय परिसरात दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना इमारतीबाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामध्ये दुपारी ३.११ वाजता न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
हेही वाचा – मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार!
सोलापूर न्यायालय परिसरही रिकामा
सांगली आणि साताऱ्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही धमकीचा ई-मेल मिळाल्याची माहिती आहे. ई-मेल प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी न्यायालयात दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना इमारतीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.
परभणी आणि हिंगोलीत पोलीस यंत्रणा सतर्क
परभणी जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर न्यायालय परिसरात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल झाले. पोलिसांकडून इमारतीची तपासणी करण्यात येत असून, ई-मेलच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.
हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयालाही न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धमकीचा संदेश प्राप्त झाल्याची माहिती आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, हिंगोली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी न्यायालयात दाखल झाले. संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू करण्यात आली असून सायबर पोलिसांकडूनही ई-मेलची चौकशी केली जात आहे.
बीडमध्येही न्यायालयाची इमारत रिकामी
बीड जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली. खबरदारी म्हणून न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस पथकाकडून इमारतीची तपासणी सुरू करण्यात आली.
बीड पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि न्यायालय परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सायबर पोलिसांकडून ई-मेलमधील माहितीची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले. लवकरात लवकर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सायबर पोलिसांकडून ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम
राज्यातील विविध न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलीस यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून संबंधित इमारतींची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस तपास करत आहेत.
या धमक्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




