“दिवाळी कशी साजरी करावी हे दिया मिर्झाने शिकवू नये”; भाजपच्या आक्षेपानंतर मुंबई महापालिकेकडून अभिनेत्रीचा व्हिडिओ डिलिट

मुंबई | दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरू केलेल्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून नवा राजकीय वाद पेटला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा हिने मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ पालिकेने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट केला होता. मात्र, “दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत,” असा तीव्र आक्षेप भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी घेतला. या आक्षेपानंतर महापालिकेने तात्काळ तो व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवला. दरम्यान, व्हिडिओ हटवल्यानंतर “भलाईचा जमानाच राहिला नाही,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत दिया मिर्झानेही संताप व्यक्त केला आहे.
पावसाळा संपताच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता आणखी बिघडू नये, यासाठी मुंबई महापालिकेने सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली होती. याअंतर्गत दिया मिर्झाचा एक व्हिडिओ पालिकेने पोस्ट केला होता. या व्हिडिओत दिया मिर्झा म्हणाली होती, “दिवाळीचा उत्सव जवळ आला आहे. हा सण साजरा करताना आपल्याला पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घ्यायची आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण हानीकारक आहे. त्यामुळे दिवाळी आवाजाने नव्हे, तर आनंदाने साजरी करा.”
हेही वाचा
‘महादेव’ बेटिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्रकर अखेर भारताच्या ताब्यात; ओमानमधून प्रत्यार्पण
🚨
BMC takes down actor Dia Mirza’s Diwali awareness video following objections from BJP Mumbai president Ameet Satam.
The video urged citizens to avoid firecrackers and noise pollution during Diwali. Satam expressed his objection on X, questioning the need for Dia Mirza to give lessons on celebrating the festival.
@deespeak @mybmc
#Diwali2026
— Girish Kamble (@GirishKamble22) November 2, 2026
अमित साटम यांचा आक्षेप; पालिकेची माघार
दिया मिर्झाच्या या आवाहनावर भाजप नेते अमित साटम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “दिवाळी कशी साजरी करायची याचे धडे आम्हाला दिया मिर्झाने शिकवू नयेत. दिवाळी आणि आमची परंपरा आमच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. आम्हाला कुणीही हे शिकवण्याची गरज नाही.” साटम यांच्या या पोस्टनंतर पालिका प्रशासनाने तातडीने तो व्हिडिओ आपल्या अधिकृत हँडलवरून डिलिट केला.
दिया मिर्झाचा पलटवार
महापालिकेने व्हिडिओ डिलिट केल्यानंतर दिया मिर्झानेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. “या सामाजिक मोहिमेसाठी मी महापालिकेकडून एक रुपयाही घेतलेला नव्हता, पर्यावरण संरक्षणासाठी मी हे आवाहन केले होते; मात्र सध्या भलाईचा जमानाच राहिला नाही,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडिओ महापालिकेने हटवला असला, तरी सध्या सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.




