TOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

स्थानिक वाहनधारकांसाठी टोल पासचे नवे दर लागू; १,५०० आणि ३,००० रुपयांत वर्षभर प्रवासाची सुविधा

टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या खासगी वाहनधारकांना वार्षिक पासचा लाभ; एका वर्षात २०० वेळा टोल पार करता येणार, मात्र काही अटी लागू.

FASTag New Rules : FASTag Annual Pass संदर्भात स्थानिक वाहनधारकांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोलच्या वार्षिक पासच्या शुल्कात बदल केला असून, त्याचा फायदा टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. नव्या दरानुसार, स्थानिक वाहनधारकांना १,५०० किंवा ३,००० रुपये शुल्क भरून वर्षभरासाठी वार्षिक टोल पास घेता येणार आहे.

टोल प्लाझाच्या ठिकाणानुसार शुल्क

नव्या नियमानुसार, टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या अंतरात राहणाऱ्या खासगी वाहनधारकांना या पाससाठी अर्ज करता येईल. टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेर असल्यास वार्षिक पाससाठी १,५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीत असल्यास ३,००० रुपये शुल्क आकारले जाईल.

या पासमुळे स्थानिक नागरिकांना संबंधित टोल प्लाझावरून वारंवार प्रवास करताना प्रत्येक वेळी स्वतंत्र टोल भरण्याची गरज भासणार नाही. सरकारकडून दरवर्षी १ एप्रिल रोजी या शुल्काचा आढावा घेतला जाणार आहे.

वार्षिक पाससाठी कोणत्या अटी आहेत?

हा पास मिळवण्यासाठी वाहनधारकाचे घर संबंधित टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिसरात असणे आवश्यक आहे. तसेच वाहनाची नोंदणी खासगी वापरासाठी झालेली असावी आणि त्यावर वैध व सक्रिय FASTag असणे बंधनकारक आहे.

कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या खासगी वाहनांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. व्यावसायिक वाहनांना या पासची सुविधा मिळणार नाही.

हेही वाचा –  चीनकडून काँग्रेसला डोनेशन का मिळते? मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींना सवाल

वर्षभरात २०० वेळा टोल पार करण्याची मुभा

या वार्षिक पासच्या माध्यमातून वाहनधारकांना एका वर्षात २०० वेळा संबंधित टोल प्लाझा पार करता येणार आहे. एकाच टोल प्लाझावरून जाताना आणि परत येताना दोन स्वतंत्र टोल क्रॉसिंग म्हणून त्यांची गणना केली जाईल. हा पास केवळ संबंधित स्थानिक टोल प्लाझासाठीच लागू असेल.

सर्व टोल प्लाझावर सुविधा उपलब्ध नाही

ही सुविधा देशातील सर्व टोल प्लाझावर लागू असेलच असे नाही. काही ठिकाणी टोल वसुलीची स्वतंत्र व्यवस्था असल्यास किंवा टोलपर्यंत जाण्यासाठी पर्यायी रस्ता अथवा सर्व्हिस रोड उपलब्ध असल्यास स्थानिक वार्षिक पासची सुविधा मिळणार नाही.

त्यामुळे टोल प्लाझाजवळ राहून वारंवार प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांना हा पास फायदेशीर ठरू शकतो. मात्र, वार्षिक पास घेण्यापूर्वी मासिक पास आणि वार्षिक पासचा खर्च, प्रवासाची वारंवारता आणि संबंधित टोल प्लाझासाठी असलेली पात्रता तपासणे आवश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button