६ लाखांचे टेबल, ७ लाखांची लिफ्ट अन् ५.८ लाखांचे वॉश बेसिन! केजरीवाल यांचा ‘शीशमहल’ लोकांसाठी खुला

नवी दिल्ली | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान असलेला आणि भाजपाने ज्याचा उल्लेख सातत्याने ‘शीशमहल’ असा केला होता, तो बंगला शुक्रवारपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. उत्तर दिल्लीतील ६, फ्लॅगस्टाफ रोड येथील या निवासस्थानातील प्रत्येक वस्तू आणि सुविधेवर भाजपाप्रणीत दिल्ली सरकारने किमतींचे फलक लावले आहेत. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून, ‘होम टूर’च्या माध्यमातून या बंगल्यावर झालेला तब्बल ५८ कोटी रुपयांचा खर्च जनतेसमोर मांडला जात आहे.
बंगल्याच्या बाहेर ५८ कोटी रुपये खर्च झाल्याचा मोठा फलक लावण्यात आला असून आतमध्ये विविध वस्तूंच्या किमती नमूद केल्या आहेत; यामध्ये ‘पावडर रूम’मधील स्वच्छतागृह आणि वॉश बेसिन ५.८ लाख रुपये, स्लायडिंग डोअरसह बैठक खोली ४१.१६ लाख रुपये, लॉबीची जागा ७.५८ लाख रुपये, स्वयंपाकघरातील ‘डंबवेटर’ (सामान ने-आण करणारी छोटी लिफ्ट) ७ लाख रुपये, एक टेबल ६ लाख रुपये आणि टीव्ही संच ३ लाख रुपये इतका खर्च दर्शवण्यात आला आहे, तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बंगला पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुमारे २० रुपये तिकीट दर आकारले जाण्याची शक्यता असून ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे.
हेही वाचा
दुर्गा टेकडीवरील वृक्षतोडीला हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा तीव्र विरोध!
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बंगला पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुमारे २० रुपये तिकीट दर आकारले जाण्याची शक्यता आहे, तर ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. २०१५ पासून ते ऑक्टोबर २०२४ मध्ये राजीनामा देईपर्यंत केजरीवाल आपल्या कुटुंबासह येथे राहत होते.
“करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देणे आमचे कर्तव्य” : प्रवेश वर्मा
या निर्णयाबाबत बोलताना भाजपा नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री प्रवेश वर्मा यांनी सांगितले की, “या मालमत्तेवर खर्च झालेल्या निधीची माहिती लोकांना मिळावी आणि करदात्यांच्या पैशांच्या वापरात पारदर्शकता यावी, हाच यामागचा एकमेव उद्देश आहे. जनतेचा पैसा येथे खर्च झाला असल्याने प्रत्येक पैशाचा हिशोब देणे हे आमचे कर्तव्य आहे.”
‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांचा पलटवार
दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली सरकारच्या या कृतीवर जोरदार टीका केली आहे. भाजपाने खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी २०२५ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने या बंगल्याच्या खर्चावरून केजरीवालांना लक्ष्य केले होते, तर ‘आप’ने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.




