TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चीनकडून काँग्रेसला डोनेशन का मिळते? मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींना सवाल

‘लोकतंत्र बचाव’ यात्रेतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधानाने निर्माण केलेल्या संस्था बदनाम करून देशात अराजकता निर्माण करण्याचा आरोप.

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकतंत्र बचाव’ यात्रेतील सभेतून काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चावर आक्षेप घेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम केले जात असल्याचा आरोप केला. तसेच, चीनकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या ट्रस्टला डोनेशन का मिळते, असा सवालही त्यांनी राहुल गांधी यांना केला.

फडणवीस म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्यानंतर आता राहुल गांधीही नागरिकांचे मूलभूत अधिकार संपवण्याच्या दिशेने जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. “इंदिरा गांधींचा नातू आता पुन्हा तेच घेऊन रस्त्यावर उतरला आहे. दारू तीच आहे, फक्त बाटली बदलली आहे. धोरण तेच असून केवळ पद्धत बदलली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांचाही उल्लेख करत फडणवीस यांनी चीनच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. “भारताला अडचणीत आणण्यासाठी आणि घुसखोरी करण्यासाठी कोणता देश आतूर आहे, तर तो चीन आहे. मग चीनकडून काँग्रेस आणि तुमच्या ट्रस्टला डोनेशन का मिळत आहे? चीनच्या पैशांवर भारतात अराजकता निर्माण करत आहात का?” असा सवाल त्यांनी केला.

‘लाल संविधान हा केवळ मुखवटा’

विरोधकांच्या भूमिकेवर टीका करताना फडणवीस यांनी ‘लाल संविधान’ हा केवळ मुखवटा असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, लाल पुस्तकाचा वापर करून देशात षड्यंत्र रचले जात आहे. नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील संविधान बदलण्याच्या प्रक्रियेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

“हातात लाल संविधान ठेवता आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना बदनाम करता. संविधान खराब आहे, असे थेट म्हटले तर लोक विरोध करतील. त्यामुळे संविधानाऐवजी त्याने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम केले जात आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

हेही वाचा –  राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवारांकडून आढावा; सोलापूरमधील १३९ गावांना फटका, १३५ टँकरने पाणीपुरवठा

निवडणूक आयोग आणि न्यायालयांवर टीका केल्याचा आरोप

फडणवीस यांनी विरोधकांकडून भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG), संसद आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात असल्याचा दावा केला. आता देशाच्या न्यायालयांनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आधी आरबीआय आणि सीएजी खराब असल्याचे सांगतात. त्यानंतर संसद संपवा आणि रस्त्यावर निर्णय घ्या, असे म्हणतात. संसद आणि निवडणूक आयोगाला शिव्या दिल्या जातात. आता देशाच्या न्यायालयांनाही शिव्या दिल्या जात आहेत. हीच अराजकता आहे,” असे फडणवीस म्हणाले.

‘लोकतंत्र बचाव’ यात्रेतील या सभेतून फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधत विरोधकांच्या आंदोलनामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button