अजित पवारांच्या निधनामुळे यंदा दिवाळी साजरी करणार नाही; शरद पवार

Sharad Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर झाला असून राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार सातत्याने महाराष्ट्रभर पाहणी दौरे करत आहेत. आज ते पंढरपुरातील गावांमध्ये शेतकऱ्यांना भेटण्याकरता गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवारांनी केंद्र सरकारकडे मदतीचं आवाहन केलं असून त्यांनी या जिल्ह्यातील दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आणले.तसंच, यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याचंही त्यांनी आज जाहीर केलं.
सोलापूरमध्ये १३९ गावं बाधित आहेत. इथं १३५ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ४० विहिरी आहेत. २१ इंधन विहिरी आहेत. माढामध्ये ११० टँकर आहेत. शेजारच्या जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. या दुष्काळग्रस्त पट्ट्यात मदतीची गरज आहे. धीर देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की राज्य सरकारने जर केंद्र सरकारला हे पटवून दिलं तर भरीव मदत मिळेल. पाण्याची दिवसेंदिवस मागणी वाढत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. खडकवासला आणि इतर धरणातील पाणी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. आजपासून जवळपास जूनपर्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याच्या साठ्यावर लक्ष दिलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
इशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम! सूर्यकुमार यादवचा ४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत
दरम्यान, याचवर्षी जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या अकस्मित निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यामुळे पवार कुटुंबीय अजूनही दुःखी असून यावेळी दिवाळी साजरी करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. त्यांना यंदाच्या दिवाळीबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले, “यंदा आमच्याकडे दिवाळी नाही. यावेळी आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. यंदा पहिल्यांदाच अजित पवारांविना दिवाळीचा सण येतोय. त्यामुळे, कुटुंबीयांना मोठं दु:ख असल्याने यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाही.”
दिवाळी पाडव्याच्या परंपरेत खंड
पवार कुटुंबीयांकडून साजरी केली जाणार दिवाळी हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी बारामतीच्या गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी शरद पवारांच्या भेटीसाठी येत असतात. मात्र, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे यंदा या परंपरेला खंड पडणार आहे.




