‘मुख्य आरोपींना अटक करा, समर्थकांना सोडून द्या’; राम पूर्णेकरांची पोलिसांकडे मागणी
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला महिना उलटूनही कुटुंबीयांचा न्यायासाठी संघर्ष सुरूच; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे

ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटून गेला असला, तरी न्यायासाठी पूर्णेकर कुटुंबीयांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका मांडत पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राम पूर्णेकर यांनी बैठकीतील माहिती दिली.
आंदोलकांना मारहाणीच्या आरोपांवर राम पूर्णेकर काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी पूर्णेकर कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलनकर्ते आणि समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपांबाबत विचारले असता राम पूर्णेकर म्हणाले, “आमचे जे वकील सोबत आले होते, त्यांनी एक पत्र दिलं आहे. ज्यांनी हे कृत्य केलं आहे, त्यांना डीसीपी साहेबच शिक्षा देतील. आपण या प्रकरणात कायदेशीर मार्गाने पुढे जाऊया. यामुळे आपण सर्व पोलिसांना बदनाम करू शकत नाही.”
पोलिस योग्य ती कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – प्रतापगड, राजगडसह चार ऐतिहासिक किल्ल्यांवर सुरक्षा रक्षक तैनात होणार; 12.93 कोटींच्या खर्चाला मंजुरी
‘समर्थकांना अटक करू नका; मुख्य आरोपींना अटक करा’
राम पूर्णेकर यांनी पोलिसांकडे आपल्या समर्थकांना अटक न करण्याची विनंती केली. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
“आमचे जे समर्थक आहेत, त्यांना अटक करू नका. या प्रकरणातील मुख्य आरोपी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांना अटक करा,” असे राम पूर्णेकर म्हणाले.
यासंदर्भात डीसीपी यांच्याशी आपले बोलणे झाले असून त्यांना संपूर्ण माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडेही न्यायाची मागणी
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही न्यायाची मागणी केली आहे.
“मुख्यमंत्र्यांना मी एवढंच सांगेन की, साहेब, ठाण्यामध्ये जे सुरू आहे ते खूप चुकीचं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना तुम्ही अटक करा, बाकीच्यांना जाऊ द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
वडिलांच्या हत्येला महिना उलटूनही पूर्णेकर कुटुंबीयांचा न्यायासाठीचा लढा सुरू आहे. राम पूर्णेकर यांनी केलेल्या मागण्यांनंतर आता पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




