उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळले; ६ जण होते स्वार

Uttarakhand Badrinath Helicopter Crash | उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथहून जोशीमठच्या दिशेने निघालेले एक हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) घडली. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह एकूण सहा जण प्रवास करत होते. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
जोशीमठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोहर कन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २:२१ वाजता जोशीमठच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून (SDM) चाई गावाच्या परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची (क्रॅश लँडिंग झाल्याची) प्राथमिक माहिती मिळाली. उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या (UCADA) अधिकाऱ्यांनुसार, हे हेलिकॉप्टर ‘ट्रान्स भारत’ कंपनीचे असून ते बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्त्रधाराच्या दिशेने निघाले होते. या हेलिकॉप्टरचे शेवटचे लोकेशन चाई गावाजवळील लष्करी तळाजवळ दिसून आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक पायलट असे एकूण सहा जण होते.
हेही वाचा
पाणीपुरवठ्याचा हिशेब द्या; पाणी विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करा!
हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्यानंतर ते कोसळले की त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले, याचा शोध घेतला जात आहे. घटनेचे वृत्त समजताच जोशीमठ आणि पांडुकेश्वर येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) पथके आणि पोलीस दल तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने हाती घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून हवाई मदतीचे निर्देश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून संपूर्ण यंत्रणा बचावकार्यासाठी कामाला लागल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “जोशीमठजवळील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि एसडीआरएफच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य वेगाने सुरू आहे. मी स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. घटनेतील गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने हवाई मार्गाने (एअरलिफ्ट) हलवण्याचे निर्देश दिले आहेत. मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”




