TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; आशिष शेलार यांची मागणी

वायुप्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र; बांधकामस्थळांवर सेन्सर यंत्रणा, रस्ते धुणे आणि स्वच्छ इंधनाच्या वापरावर भर

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली आहे. २०१७-१८ पासून मुंबईतील पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत सुमारे ४८ टक्क्यांनी घट झाली असली, तरी प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.

बांधकामस्थळांवर सेन्सर यंत्रणा बसविण्याची सूचना

बांधकामस्थळांवरील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना शेलार यांनी केली आहे. तसेच, लाकूड किंवा कोळशाचा वापर करणाऱ्या बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र श्रेणीबद्ध कृती आराखडा तयार करून त्यातील उपाययोजना पूर्वनिश्चित पद्धतीने लागू कराव्यात, असेही त्यांनी सुचविले आहे.

हेही वाचा –  दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर निर्बंध; मराठी सेलिब्रिटींनी जनजागृतीत सहभागी व्हावे – उच्च न्यायालय

रस्ते स्वच्छता आणि धुळीवर नियंत्रण

प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवरील धूळ कमी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे आणि पाण्याची फवारणी करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

रस्त्यांवरील खड्डे खोदकाम आणि विविध विकासकामांनंतर रस्ते पूर्ववत करण्याची कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून धुळीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बांधकामे, वाहतूक, रस्त्यांवरील धूळ आणि इंधनाचा वापर अशा विविध स्रोतांवर एकाच वेळी उपाययोजना करण्याची आवश्यकता या पत्रातून अधोरेखित करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button