TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘उलथापालथ व्हायला हा काही भूकंप नाही!’; गणेश नाईकांच्या विधानावर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

नाना पटोलेंच्या मतदानातील गैरप्रकारांच्या आरोपांवरही निशाणा; दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर आणि जळगाव जिल्हा बँकेच्या जागावाटपावर स्पष्ट भूमिका

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे विधान भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी केले होते. या विधानावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “उलथापालथ व्हायला काही तो भूकंप थोडीच आहे. जे व्हायचे असते ते ठरलेले असते आणि जे होईल ते आपण पाहूच,” असे ते म्हणाले.

कोणाच्या भविष्यवाणीवर किंवा भाकितावर राजकीय घडामोडी घडतील, असे आपण मानत नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. सर्वजण एकत्र येऊन सामूहिक निर्णय घेतात, तेव्हाच राजकीय उलथापालथ होत असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाना पटोलेंच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचा सवाल

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदान वाढवून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

“नानाभाऊंना हे तीन वर्षांनंतरच कसे सुचले? त्यांनी त्याच वेळी हे बोलायला हवे होते,” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. आता केवळ नवीन मुद्दे तयार करण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणावर भाष्य टाळले

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेसह राष्ट्रवादीला अर्थखाते मिळण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

“सुनेत्राताई पवार आणि शरद पवार साहेब यांचा हा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा, यावर मी बोलणे उचित ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. छगन भुजबळ यांनी केलेले विधान किंवा अर्थखात्याबाबत झालेल्या चर्चेची आपल्याला माहिती नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा –  आकाशात राफेलसह १०० विमानांचा थरार! ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शोने वेधले देशाचे लक्ष

निलेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया

शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबाबतही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “चांगले आहे, ते शेवटी आमच्या मित्रपक्षातच गेले आहेत. त्यामुळे त्यांना शेवटी आमचाच प्रचार करायचा आहे,” असे ते म्हणाले.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना, महायुतीचे सर्व नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि त्या बैठकीत जागावाटपाचा योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

टोरेंट प्रकल्पावर सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न

कर्जत-भीमाशंकर पट्ट्यातील टोरेंट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधाबाबतही गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडली. या विषयावर राज ठाकरे यांची कर्जतमध्ये सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

“झाडे वाचली पाहिजेत आणि त्याचसोबत विकास प्रकल्पही झाले पाहिजेत. या दोघांमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सरकार निश्चितपणे करेल,” असे पाटील म्हणाले. पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न सरकार करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button