Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; छगन भुजबळांचे निर्देश

पिण्याचे पाणी, धान्य आणि पशुधनाच्या चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना; येवला-निफाडमधील पाणीपुरवठा, वीज आणि विकासकामांचा घेतला आढावा

नाशिक : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, तसेच येवला मतदारसंघातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येवला संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक उपाययोजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतिमान ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पशुधनासाठी चारा उपलब्धतेवर भर

पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. वनविभागाच्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासावी. आवश्यक नियम आणि परवानग्यांच्या अधीन राहून मेंढपाळ व चराऊ जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  लातूरमध्ये महा विधी सेवा शिबिरातून गरजूंना शासकीय योजनांचा लाभ

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा

बैठकीत येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली रेट्रोफिटिंगची कामे आणि अन्य प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

येवला आणि निफाड तालुक्यांतील शेती तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचाही आढावा घेण्यात आला. नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि शेतकरी व नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.

रस्ते, घरकुल आणि नदी संवर्धनाच्या कामांना गती

बैठकीत लासलगाव येथील घरकुल आवास योजना, शहरातील कचरा डेपोसाठी पर्यायी जागा निश्चित करणे, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, लासलगाव-विंचूर चौपदरी रस्ता आणि खेडलेझुंगे येथील काँक्रीट रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शीव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचीही माहिती घेण्यात आली. प्रलंबित बाबींची पूर्तता करून विकासकामांना गती द्यावी आणि नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

बैठकीला येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हिमांशु चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button