आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे : डॉ. अशोक वुईके
पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना नियुक्तीस्थळी पूर्णवेळ राहण्याचे आवाहन; गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणावर भर

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करावे. तसेच नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपायुक्त संतोष ठुबे यांच्यासह विभागातील अधिकारी आणि नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते.
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि प्रगतीच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. पात्र आणि सक्षम शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यात गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले आहे, असे डॉ. वुईके यांनी सांगितले.
शिक्षकांनी आपल्या नियुक्तीकडे केवळ नोकरीची संधी म्हणून न पाहता आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी म्हणून पाहावे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळांमधील प्रवेशसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. आधुनिक ज्ञान, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि प्रभावी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा – दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; छगन भुजबळांचे निर्देश
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव द्या : नरहरी झिरवाळ
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्ये आणि महत्त्वाकांक्षा विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन दिल्यास तो जीवनात प्रगती करू शकतो.
मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी नियमित सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे आहेत. शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन झिरवाळ यांनी केले.
यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी नवनियुक्त शिक्षकांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध आदिवासी आश्रमशाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना मंत्री डॉ. अशोक वुईके, मंत्री नरहरी झिरवाळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.




