खरगेंच्या ‘मोदी का बाप भी जाएगा’ विधानावरून राजकीय वाद; अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
पाटण्यातील सभेत पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा आक्षेप; ‘काँग्रेसचा जनाधार संपला’ असा अमित शाहांचा दावा

पाटणा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या विधानावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिहारमधील पाटणा येथे एका कार्यक्रमात बोलताना खरगे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत खरगे यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचा जनाधार कमी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
खरगे पाटणा येथील एका कार्यक्रमात भाजपवर टीका करत होते. त्यावेळी उपस्थितांपैकी एका व्यक्तीने ‘मोदी नहीं जाएंगे’ असे म्हटले. त्यावर प्रत्युत्तर देताना खरगे यांनी ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे विधान केल्याचे वृत्त आहे. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, खरगे यांच्या भाषेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे खरगे यांच्या विधानावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांबाबत वक्तव्य करून खरगे यांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्या आईबाबत अपमानास्पद शब्द वापरल्याचा आणि त्यांना ‘मौत का सौदागर’ तसेच ‘चायवाला’ अशा शब्दांत संबोधल्याचा संदर्भ शाह यांनी दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे नेते वारंवार सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘काँग्रेसचा जनाधार संपला’; अमित शाहांचा दावा
गेल्या १२ वर्षांत विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याचा दावा करत अमित शाह यांनी पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसकडे आता ठोस रणनीती उरलेली नसून, पक्षाचे नेते केवळ टीका आणि अपशब्दांचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचा जनाधार संपत चालला असून, पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर जात असल्याचा दावा शाह यांनी केला. दरम्यान, खरगे यांच्या विधानावर काँग्रेसकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि या मुद्द्यावरून पुढे राजकीय संघर्ष किती तीव्र होतो, याकडे लक्ष लागले आहे.




