Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना; रघुनाथ माशेलकर, अशोक सराफ, अंजली भागवत यांचा समावेश

मुख्यमंत्री अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष; डॉ. तात्याराव लहाने आणि उद्योजक दिलीप दांडेकर यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी

मुंबई : राज्याच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निवड समितीची राज्य सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या समितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, उद्योजक दिलीप दांडेकर आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे समितीचे अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारीतील विविध समित्यांवरील अशासकीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या यापूर्वी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नव्या समितीत सहा शासकीय आणि पाच अशासकीय सदस्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष

नव्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. सांस्कृतिक कार्यमंत्री, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतील.

अशासकीय सदस्य म्हणून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. तात्याराव लहाने, अशोक सराफ, दिलीप दांडेकर आणि अंजली भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती तीन वर्षे किंवा पुढील पुनर्रचना होईपर्यंत कार्यरत राहणार आहे. यापैकी जी घटना आधी घडेल, तोपर्यंत समितीचा कार्यकाळ राहील.

हेही वाचा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नागपुरातील दुर्गा मातेचे दर्शन; विविध उत्सव मंडळांना भेटी

यापूर्वीही समितीची पुनर्रचना

महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची यापूर्वीही वेळोवेळी पुनर्रचना करण्यात आली आहे. याआधी ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, चित्रकार वासुदेव कामत, पुरातत्त्व अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शशिकला वंजारी आणि ॲड. उज्ज्वल निकम यांचा समितीत समावेश होता.

काय आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्त्व?

विविध क्षेत्रांत निरपेक्ष वृत्तीने कार्य करून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. १९९५ पासून सुरू झालेला हा पुरस्कार महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो.

विज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी या समितीवर असते. त्यामुळे नव्या समितीच्या माध्यमातून पुरस्कार निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button