ग्रंथालये टिकवणे काळाची गरज; वाचन संस्कृतीतूनच घडते समृद्ध पिढी – उपसभापती सचिन अहिर
‘वाचन प्रेरणा दिन २०२६’निमित्त अर्थशास्त्र परिभाषा कोषाचे प्रकाशन; वाचन संस्कृती जोपासणाऱ्या वाचक प्रेरकांचा सन्मान

मुंबई : ग्रंथ माणसाला घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालये टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केले.
मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ निमित्त शासकीय विधि महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी सचिन अहिर यांच्या हस्ते ‘अर्थशास्त्र परिभाषा कोषा’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी योगदान देणाऱ्या वाचक प्रेरकांचा सत्कार करण्यात आला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपत तिला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद असल्याचे अहिर यांनी सांगितले.
कामगार चळवळीतून वाचन संस्कृतीचा वारसा
या वेळी सचिन अहिर यांनी कामगार चळवळीतील आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रीय मजदूर मिल संघाचे संस्थापक डॉ. ग. द. आंबेकर यांनी कामगारांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने ग्रंथालयाची स्थापना केली होती. त्या काळात सुरू झालेली वाचन संस्कृतीची परंपरा आजही पुढे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, विचारांची व्याप्ती वाढते आणि ज्ञानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ग्रंथालयांचे जतन आणि वाचन संस्कृतीचा प्रसार यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, भाषा संचालक डॉ. अरुण गीते, शासकीय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, समीक्षक डॉ. नितीन रिंढे, डॉ. विजय ककडे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. राहुल गांगुर्डे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.




