Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्राच्या श्रद्धा लोंढेची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; ‘इन्स्पायर–मानक’मध्ये प्रथम क्रमांक

राष्ट्रीय स्पर्धेतील ‘सुपर ६०’मध्ये महाराष्ट्राचे सात विद्यार्थी; दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी AI आधारित शिक्षक सहाय्यक प्रकल्पाला विशेष सुवर्णपदक

मुंबई : विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदक मिळविले. या यशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी श्रद्धासह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी १२ वी राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले. देशभरातून सुमारे ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रकल्पांचे नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, वापरण्यातील सुलभता आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता या निकषांवर उत्कृष्ट ६० प्रकल्पांची ‘सुपर ६०’ गटासाठी निवड करण्यात आली. या गटात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून राज्याच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्राचा गौरव वाढविला.

दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी AI आधारित प्रकल्पाला सुवर्णपदक

अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव येथील विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ या प्रोटोटाइपसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना सहाय्य करण्याची संकल्पना या प्रकल्पात मांडण्यात आली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते श्रद्धाला विशेष सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने तिचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हेही वाचा –  ग्रंथालये टिकवणे काळाची गरज; वाचन संस्कृतीतूनच घडते समृद्ध पिढी – उपसभापती सचिन अहिर

‘सुपर ६०’मध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थी

श्रद्धा लोंढे हिच्यासह महाराष्ट्रातील आणखी सहा विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’मध्ये स्थान मिळविले. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद स्कूल, लक्ष्मीवाडी येथील राजवर्धन प्रदीप काळे; पुण्यातील एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची देविका सुहास ताड; सिटी प्राइड स्कूलचा अर्णव भुसारी; डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची गीता गणपत धनवडे; सोलापूर जिल्ह्यातील के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोट येथील शांभवी रामनप्पा अजगुंडे आणि वाशिम येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विराज संदीप शिंदे यांचा समावेश आहे.

या सातही विद्यार्थ्यांना डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संबंधित शाळांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

विज्ञान क्षेत्रातील संधींसाठी राज्य शासनाचे प्रोत्साहन

विद्यार्थ्यांमधील विज्ञानविषयक आवड आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. ‘विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून ‘नासा’ला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नमूद केले.

तसेच, राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेतील ‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव घेण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button